अहवाल आल्यानंतर गारपीटग्रस्तांना मदत- मुख्यमंत्री

मुंबई – गेल्या चार दिवसांपासून गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका राज्यातील १३ जिल्ह्यांला बसला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण १.३६ लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतीचे नुकसान झाले आहे; अशी माहिती मुख्यमंत्री चव्हाण यांनी दिली. आगामी काळात गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका बसलेल्याआ भागाला राज्य आपत्ती निवारण निधीतून या भागांना तातडीची मदत दिली जाईल. त्या‍शिवाय अन्यर भरपाईसाठी येत्या दोन दिवसांत संपूर्ण राज्यापतील अहवाल आल्यानंतर मदतीसाठी मंत्रिमंडळ निर्णय घेणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

गेल्या चार दिवासांपासून गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका राज्याच्या १३ जिल्ह्यात बसला आहे. यामुळे पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या आपत्तीसंदर्भात चर्चेदरम्यान विरोधी आमदारांनी सरकारला धारेवर धरले. प्रति हेक्टरी २० हजार रुपयांची मदत करा आणि गारपीटग्रस्त शेतक-याचे कृषी कर्जाचे हप्ते बंद करा या दोन प्रमुख मागण्या विरोधकांनी केल्या आहेत. सरकारने नेहमीच भरीव मदत केली असून याहीवेळी तशी मदत केली जाईल, असे पतंगराव कदम यांनी सांगितले.

आगामी काळात नुकसान भरपाईबाबत शासनाने तातडीने पावले उचलावीत, असे निर्देश विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी बुधवारी दिले. शिवाय शासनाने शुक्रवारी निवेदन करावे, असेही निर्देश त्यांनी दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात शेतक-यांना काय मदत मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment