सॅमसंगचा ‘गॅलॅक्सी एस ५’ वॉटरप्रूफ

बार्सिलोना- स्मार्टफोन बाजारपेठेवर अधिराज्य गाजवणा-या सॅमसंगने सोमवारी लोकप्रिय गॅलॅक्सी श्रेणीतील एस ५ या नव्या फोनला वॉटरप्रूफ वैशिष्टयासह आणत क्रांतिकारी पाऊल टाकले आहे. येथे सुरू असलेल्या मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये कंपनीने ‘एस ५’ बरोबरच ‘गिअर २’ स्मार्टवॉच आणि हृदयाची स्पंदने जाणणा-या ‘गिअर फिट’ या फिटनेस बँडलाही सादर केले. अ‍ॅपलच्या गॅजेटमधील मक्तेदारीला मोडीत काढण्यासाठी सॅमसंगकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत.

गॅलॅक्सी ‘एस ५’मध्ये किटकॅट अँड्रॉइडचा समावेश असून त्याला ५.१ इंचाची स्क्रीन आहे. तसेच हा फोन वॉटरप्रूफ असून यामध्ये कंपनीने पहिल्यांदाच अल्ट्रा पॉवर सेव्हिंग मोडची सुविधा दिली आहे. त्याचबरोबर यात १६ मेगापिक्सेलचा कॅमेराही आहे. आधीच्या गॅलॅक्सी एस फोनपेक्षा एस ५ ची स्क्रीन मोठी आहे. अल्ट्रा पॉवर सेव्हिंगमुळे १० टक्के बॅटरीवर किमान २४ तास फोन चालू राहू शकतो, असा दावा कंपनीने केला आहे. शेवटच्या १० टक्के बॅटरीवर इतर अ‍ॅप्स आणि फंक्शन बंद करून त्यावरून पुढील २४ तास कॉल करणे आणि मेसेज पाठवणे शक्य होऊ शकते, असे कंपनीने म्हटले आहे.

हा फोन चार रंगांमध्ये उपलब्ध आहे. पाणी आणि धुळीपासून संरक्षण होईल, असे बाह्य आवरण ‘एस ५’ वर आहे. याच परिषदेत सॅमसंगने ‘गिअर फिट’ या मनगटावर घालता येणा-या फिटनेस बँडला सादर केले. यावर युजरला मोबाइल डेटा पाहता येणार असून मोबाइलधारकाच्या हृदयाची स्पंदनेही या गॅजेटमध्ये नोंदवली जाणार आहे. ज्यामुळे आरोग्याची काळजी गिअर फिटमधून घेतली जाईल, असे कंपनीने म्हटले आहे. तसेच स्मार्टवॉचची सुधारित आवृती ‘गिअर २’लाही सादर केले. पहिल्या गिअर वॉचवर टीका झाल्याने गिअर २मध्ये अँड्रॉइडचा समावेश करण्यात आला आहे. ११ एप्रिलपासून जगभरातील १५० देशांमध्ये ही दोन्ही उत्पादने उपलब्ध होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. गेल्या वर्षभरात सॅमसंगने गॅलॅक्सी आणि गिअरच्या प्रचारासाठी चार अब्ज डॉलरचा खर्च केला आहे. अ‍ॅपलच्या तुलनेत हा चारपटीने जास्त आहे. कंपनीकडून इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपेक्षा मोबाइल फोन्सच्या प्रचारासाठी मोठया प्रमाणात खर्च करण्यात येत आहे.

Leave a Comment