बारावी परीक्षेचा तिढा सुटेना

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला बारवीच्या परीक्षेचा गोंधळ काही केल्या सुटण्यास तयार नाही. त्यामुळे दिवसेंदिवस तिढा वाढतच आहे. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या बहिष्कारामुळे बारावी परीक्षेच्या मुख्य नियामकांची (चीफ मॉडरेटर्स) बैठक मंगळवारीही होऊ शकली नाही. जोपर्यंत मुख्य नियामकांची बैठक होत नाही तोपर्यंत उत्तरपत्रिका तपासणीच्या कामाला सुरुवात करता येत नाही. त्यामुळे, काही शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीच्या कामात सहभागी होण्याची तयारी दर्शविली असली तरी नियमाप्रमाणे ते सुरू करता येणार नाही, असे ‘राज्य महासंघ कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना’ या आंदोलनकर्त्यां संघटनेने स्पष्ट केले आहे.

वेतन व सेवाविषयक मागण्यांकरिता राज्यभरातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीच्या कामावर बहिष्कार टाकला आहे. याचाच एक भाग म्हणून पुण्यात होणा-या मुख्य नियामकांच्या बैठकीवरही शिक्षक बहिष्कार टाकत आहेत. मंगळवारी परीक्षेच्या सलग पाचव्या दिवशीही हा बहिष्कार कायम होता. आतापर्यंत एकही विषयाच्या मुख्य नियामकांची बैठक होऊ शकलेली नाही. प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकेतील चुका शोधून त्यात दुरूस्ती करणे, गुणांची रचना ठरविणे आदी परीक्षेतर कामांसाठी ही बैठक घेतली जात असून ती परीक्षा व्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे, जोपर्यंत मुख्य नियामकांच्या बैठका होत नाही, तोपर्यंत उत्तरपत्रिका तपासणीला सुरूवात करता येणार नाही.

बारावीच्या परीक्षेत भौतिकशास्त्र, राज्यशास्त्र आणि ‘सेक्रेटरीयल प्रॅक्टिस’ या विषयांच्या परीक्षा मंगळवारी झाल्या. या परीक्षांमध्ये मिळून तब्बल ९९ कॉपीची प्रकरणे राज्यभरात आढळून आली. त्यापैकी सर्वाधिक म्हणजे ४० प्रकरणे एकटय़ा नागपूरमध्ये आढळून आली आहेत. विषय जितका कठीण तितकी कॉपीची प्रकरणे अधिक या नुसार कॉपीच्या प्रकरणांनी मंगळवारी एकदम उसळी मारली.

Leave a Comment