पुण्याच्या सीटसाठी मीरा कलमाडींची वर्णी ?

पुणे – पुण्यातील लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेसमधून निलंबित केलेले माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या पत्नी मीरा कलमाडी यांची वर्णी लागेल असे दाट संकेत दिले गेले आहेत. काँग्रेसचे प्रचारप्रमुख आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भ्रष्टाचार्‍यांना काँग्रेस तिकीट देणार नाही असा पवित्रा घेतला असला तरी सध्याच्या परिस्थितीत सीट जिंकणे यालाच सर्वाधिक प्राधान्य दिले जाणार असल्याने आणि मीरा कलमाडी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप नसल्याने तसेच सुरेश कलमाडी यांची पुणे मतदारसंघावर अजूनही असलेली घट्ट पकड लक्षात घेता मीरा कलमाडी या उमेदवार असू शकतात असे वरीष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे.

कलमाडी यांच्यावर राष्ट्रकुल स्पर्धेत भ्रष्टाचाराचे आरोप लावले गेले आहेत आणि त्यांना ११ महिने तुरूंगातही घालवावे लागले आहेत. त्यानंतर जामीनावर सुटल्यावर कलमाडी फारसे सक्रीय नव्हते मात्र लोकसभा निवडणुका तोंडावर येताच ते पुन्हा राजकारणात सक्रीय झाले आहेत. पुण्यावर कलमाडी यांची अजूनही पकड असून त्यांचे अनेक समर्थक काँग्रेस नेत्यांकडे कलमाडींच्या तिकीटासाठी आग्रह धरत आहेत.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कलमाडींच्या तिकीटाविरोधात आहेत आणि त्यांनी पुण्याचे तिकीट युवा काँग्रेस नेत्याला दिले जावे असे मत व्यक्त केले असल्याचेही सांगितले जात आहे. मात्र कलमाडींना वगळून अन्य कोणालाही तिकीट दिले गेले तर या अधिकृत उमेदवाराचा प्रचार उधळून लावण्याची क्षमता कलमाडींमध्ये असल्याने चव्हाण यांचे मत कितपत विचारात घेतले जाईल याची शंका व्यक्त केली जात आहे.

दुसरीकडे आदर्श घोटाळा प्रकरणात आरोप सिद्ध न होताही मुख्यमंत्रीपदाचा त्याग करावा लागलेल्या अशोक चव्हाण यांनीही पत्नीसाठी तिकीट मागितले आहे. अशोक चव्हाण यांच्यावर अन्याय झाल्याची भावना तीव्र आहेच पण नांदेड मतदारसंघावर त्यांचा असलेला होल्ड लक्षात घेता ही जागा टिकवून ठेवण्यासाठी त्यांची पत्नी अनिता यांच्या नावाचा विचार होऊ शकतो असे वरीष्ठ नेत्यांचे मत आहे. त्यातच अशोक चव्हाण यांचे राजकीय पुनर्वसन केले जावे असे काँग्रेसच्या नेतृत्वाच्या विचाराधीन आहे. त्यामुळे अनिता यांची नांदेड मतदारसंघासाठी वर्णी लागण्याचे चान्सेस अधिक आहेत असेही मत व्यक्त केले जात आहे.

Leave a Comment