तालिबानी तळावर हवाई हल्ले, ३० दहशतवाद्यांचा मृत्यू

पेशावर – पाकिस्तानच्या वायू दलाने मंगळवारी सकाळी उत्तर आणि दक्षिण वझरिस्तानमधील तालिबानी दहशतवाद्यांच्या तळांवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यामध्ये आतापर्यंत ३० दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पेशावरमधील सुरक्षा अधिका-यांनी दिली आहे. हे हवाई हल्ले म्हणजे पाकिस्तानी लष्कराच्या नव्या रणनितीचा भाग आहे. यापुढे गुप्तचरांकडून मिळालेल्या ठोस माहितीच्या आधारावर मर्यादीत स्वरुपात अशा प्रकराची कारवाई करण्यात येणार आहे.

मंगळवारी सकाळीच हवाई हल्ले करण्यात आले. शावल खो-यातील दहशतवाद्यांची सर्व तळ नष्ट करण्यात आल्याचे अधिका-याने सांगितले. गेल्या आठवडयापासून वझरिस्तानच्या वेगवेगळया भागांमध्ये असे हल्ले सुरु करण्यात आले आहेत. लवकरच दहशतवाद्यांविरोधात पूर्ण क्षमतेने लष्करी कारवाई करण्याचे हे संकेत आहेत. हजारो नागरिक या भागातून पळ काढत आहेत. तालिबान बरोबरची शांतता चर्चा फिस्कटल्यानंतर लष्कराने पुन्हा कारवाई सुरु केली आहे. पाकिस्तान सरकारने अजूनही तोडगा निघण्याची आशा सोडलेली नाही. तालिबानने शस्त्रसंधी जाहीर करावी अशी मागणी पाकिस्तान सरकारने केली आहे.

Leave a Comment