डलहौसी- देवभूमी हिमाचलमधील आगळे पर्यटनस्थळ

हिमाचल या राज्याला देवभूमी असेच संबोधले जाते. येथील अनेक सुंदर सुंदर ठिकाणे  पर्यटकांसाठी आनंदाचा आगळा ठेवा घेऊन सज्ज झालेली आहेतच. त्यातीलच एक आहे डलहौसी. स्वच्छ सुंदर प्रदूषणमुक्त हवा. बर्फाच्छादीत डोंगररांगा, स्वच्छ पाण्याचे अनेक झरे, चोहोकडे नजर जाईल तेथपर्यंत पसरलेले हिरवे गालिचे, हिमनद्या यांनी परिपूर्ण असे हे स्थळ आवर्जून एकदा तरी पहावे असेच आहे.

समुद्रसपाटीपासून २७०० मीटर उंचीवरचे हे स्थळ १८५४ साली भारतात असलेल्या लॉर्ड डलहौसी यांच्यामुळे प्रसिद्ध झाले. पाच पहाडांवर बसलेले हे गांव सेंट अॅन्ड्रू, सेंट पेट्रीक, सेंट फ्रान्सिस, सेंट जॉन अशा अनेक चर्चेसमुळेही प्रसिद्ध आहे. राजा भूरी याने १९०८ साली दान केलेले संग्रहालय हे याचे आणखी एक वैशिष्ठ. येथील चित्रे आवर्जून न्याहाळावीत अशीच. राजा उमेदसिंग यांनी बांधलेला रंगमहाल हा मुघल आणि ब्रिटीश वास्तूकलेचा मेळ असलेला सुंदर महाल म्हणजे वास्तुकलेचा उत्तम नमुनाच आहे. येथील भिंती पंजाबी शैलीतील चित्रांनी सजविल्या गेल्या आहेत. त्यात कृष्ण जीवन रेखाटले गेले आहे.

येथील सर्वात जुन्या माऊंट व्ह्यू हॉटेलला भेट देणेही गरजेचेच बरं का? हे हॉटेल ११९ वर्षांचे जुने आहे. १८९५ साली बांधले गेलेले हे हॉटेल तेव्हापासून ते आजतागायत एकाच कुटुंबाकडे आहे आणि आजही ते उत्तम स्थितीत सांभाळले गेले आहे.डलहौसी पासून जवळच असलेल्या खज्जियार या ठिकाणी बशीच्या आकाराचे सुंदर तळे पाहायला मिळते. खज्जिआरला जाणारा रस्ता वळणावळणाचा आणि बर्फाच्छादित डोंगरातून जाणारा अतिशय मनोहर असा आहे. खुद्द खज्जियारमध्ये मात्र चोंहोबाजूंनी हिरवळीने मढलेले डोंगर आणि मधोमध हे तळे निसर्गसौदर्यांची निराळीच अनुभूती डोळ्यांना देते.

मार्च ते जून हा येथला खरा पर्यटन मोसम असला तरी पर्यटक ऐन थंडीत येथे जाण्यास अधिक पसंती देताना दिसतात. त्यामुळे बर्फवृष्टीचा आनंद उपभोगता येतो. पठाणकोटपासून विमान सेवा, रस्तामार्गेही डलहौसीला जाता येते.

Leave a Comment