कलमाडींच्या मुसंडीच्या बातमीने पुणे मतदारसंघाचे वातावरण पुन्हा तापले

सोमवारी पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री नारायण सामी यांनी ‘ज्यांच्यावर गुन्हेगारी आरोप सिद्ध झालेला नाही त्यांना काँग्रेस गुन्हेगार मानणार नाही आणि त्यांचा लोकसभा लढविण्याचा हक्क कायम राहील, असे विधान केल्याने पुण्यात कलमाडी समर्थक आणि नांदेडमध्ये ‘आदर्श’मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या लोकसभेच्या रिंगणात परतण्याच्या अशा पालवल्या आहेत. पुण्यात सुरेश कलमाडी यांना तिकीट मिळेल, असे कोणी मानायला तयार नाही पण कलमाडी यांच्या पत्नी मीराबाई यांना तिकीट मिळेल,असे वाटू लागले आहे. अर्थात कलमाडी यांच्या पक्षाच्या तिकिटाचा मार्ग मोकळा झाला तरी निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला असे मात्र नाही कारण यावेळी पुण्याचे वातावरण आणि त्याच बरोबर देशाचेही वातावरण बदलले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत कलमाडी उतरले तेंव्हा त्यापूर्वी 29 वर्षे खासदार असणारे राजकीय व्यक्तिमत्व अशी त्यांची प्रतिमा होती पण यावेळी त्यांची प्रतिमा ही दहा महिने तिहारजेलची हवा काटली आहे, अशीच आहे. ज्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधीने त्याच्याच पक्षाची सत्ता असताना जेंव्हा काही हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारासाठी एकवर्षभरपर्यंत तिहारजेलची हवा काटली असेल तर तो निवडून येण्याची शक्यता किती हे सांगणे अवघड नाही. पण असे विक्रम अनेक वेळा झारखंडमध्ये झाले आहेत व पश्चिम महाराष्ट्राचा अनेक अर्थांनी झारखंडच झाला असल्याने पुण्याचे विद्यमान खासदार सुरेश कलमाडीही अजून आशा धरून आहेत. त्यांच्या हाताशी असणारे हुकुमाचे पान येवढेच आहे की, जर मला संपविण्याची भाषा करणार असाल तर पुण्यासह अजून तीनचार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला संपविण्याचे काम मी करून दाखवीन. यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी आपल्या पत्नी मीराबाई यांना तिकीट द्यावे असा एक मार्ग काढला. त्यावर सध्या गंभीरपणे विचार सुरु असल्याचा त्यांना निरोप आला पण दुसर्‍या बाजूला नारायणराव राणे यांच्याबरोबर शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेलेले आमदार विनायक निम्हण यांना काँग्रेसमधील कोणीतरी श्रेष्ठींनी प्रचार सुुरु करण्याचा संकेत दिला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या वतीने आमदार विनायक निम्हण यांनी प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली आहे.

असे असले तरी काँग्रेसच्या बाजूने अजूनही कलमाडींचे कोणीतरी किंवा निम्हण अशी दोन नावे रिंगणात आहेत आणि भाजपाच्या बाजूने अनिल शिरोळे आणि गिरीश बापट अशी नावे आहेत. बापट व शिरोळे या नावावर दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते ठाम असल्याचे चिन्ह गेल्या आठवड्यात होते तेंव्हा ‘अशवेळी’ माजी खासदारे प्रदीप रावत व राज्यसभेचे विद्यमान सदस्य प्रकाश जावडेकर यांचीही नावे पुढे आली. त्यांचे मेळावेही चांगले झाले तरीही आजमितीला शिरोळे आणि बापट अशी दोन नावे अधिक चर्चेत आहेत. पुण्यात मनसे आणि आप यांचे कसलेही वातावरण नाही. त्यांचे उमेद्वार उभे राहणार हे निश्चित आहे आणि ते भाजपाचीच मते खाणार हेही निश्चित आहे तरीही सध्या परिस्थितीचा रेटा येवढाआहे.
अर्थात कोणतीही निवडणूक ‘गृहीत’ धरता येत नसते. पुण्यात आजपर्यंतच्या इतिहासात फारच थोड्या वेळेला विरोधी पक्षांना यश मिळाले आहे. भाजपा आल्यापासून झालेल्या आठ लोकसभा निवडणुकीत फक्त दोनवेळा भाजपाला यश मिळाले आहे. दहा लाख मतदारसंख्या असलेला हा मतदारसंघ प्रामुख्याने काँगे्रसचा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणाचे वैशिष्ठ्यच असे की येथे राजकारणात ‘जातीयवाद’ फारच मोठ्या प्रमाणावर आहे. भारतात सर्वात अधिक राजकीय जातीयवाद महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्रात हा जातीयवाद पश्चिम महाराष्ट्रात अधिक आहे. राजकारणातील जातीयवादाचे दृश्य रूप म्हणजे दहशतवाद. सातारा,सांगली,कोल्हापूरजिल्ह्यात विरोधी पक्षांच्या बूथवर काम करणार्‍या कार्यकर्त्यांलाही नंतर त्रास होतो ही वस्तुस्थिती आहे. त्यामानाने शहरी भागात वस्तुस्थिती सौम्य असते. तरीही जातीय समीकरणेही हीच निवडणुकीचे भवितव्य ठरवितात. पुण्यातील लोकसभेला निवडून येण्याचे राजकीय समीकरण असे की, येथे सेहेचाळीस टक्के मराठा समाज आहे. त्यांची मते काँग्रेसला जातीय आधारावर मिळतात. त्याला पूरक मुस्लीम व झोपडपट्टी येथील मते विकत घेता येतात. येथे ओबीसी समाज वीस टक्के आहे. त्यांची मते प्रत्येक पक्षाला कौशल्याने मिळत असतात. हा येथे जातीयवाद असला तरी मराठा समाजाची मते ही बहुतेकवेळा सत्ता असणाराकडेच जात असतात. आतापयर्र्तच्या चार निवडणुकात सुरेश कलमाडी हे मराठा नसताना व महाराष्ट्रीय नसतानाही कॉग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आहेत. त्यामुळे जातीय राजकारणावरही पक्षीय राजकारण आणि सत्तचे राजकारण कडी करत असते.

असे असले तरी पुण्यात जे जे मतदारांचे आढावे घेण्यात आले त्यात नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान केले पाहिजे, असाच विचार मतदार करत असल्याचे निष्कर्ष हाती आला आहे. पुण्यात फारच मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी वर्ग व आयटीमध्ये काम करणारा इंजिनिअरवर्ग आहे. त्यांनी मनापासून मोदीयांच्या नावाला पसंती दिली आहे. त्याच बरोबर योगी रामदेवबाबा आणि श्री श्री रविशंकर यांचा मोठा अनुयायीवर्ग मोदी यांच्यासाठी काम करत आहे. ही ताकद यापूर्वी कधीही ‘कृतीशील’ झालेली नव्हती आणि त्यांचा पुण्यात मोठा प्रभाव आहे त्यामुळे त्यांचा परिणाम होण्याची शक्यता अधिक आहे. त्याच प्रमाणे पुण्यातील गुजराथी समाज आणि मारवाडी व्यापारी समाज अंग झटकून कामाला लागलेला दिसत आहे.

यापूर्वीपेक्षा प्रथमच कार्यरत झालेला अजून एक मोठा घटक म्हणजे यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते नेटाने कामाला लागलेले दिसत आहेत. अर्थात त्यांची कामाची दिशा ही लोकशाही जागृतीची आहे. या समाजातील फार मोठा वर्ग हा मतदानालाच जात नाही आणि नंतर मात्र राजकीय दुरावस्थेबाबत तक्रारी करत राहातो. त्यासाठी त्या समाजाने लोकशाहीच्या या प्रक्रियेत ‘जागल्या’ची भूमिका घेणे आवश्यक आहे त्यासाठी मतदार असलेल्या प्रत्येकाची मतदार नोंदणी झालीच पाहिजे. आपले नाव मतदारयादीत मुद्रित होवून आले आहे का त्यात काही चुका नाहीत ना हे तपासले पाहिजे व काही चुका असतील तर त्या दुरुस्त करण्याची प्रक्रियाही झाली पाहिजे,असा त्यांचा आग्रहाचा मुद्दा आहे. काही महिन्यापूर्वी उत्तरेतील मध्यप्रदेश, छत्तीस गड व राजस्थान या राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत अशा जागृतीमुळे पंधरा टक्के मतदान वाढले त्यातील दहा टक्के मते भाजपाला मिळाली. संघाच्या कार्यकर्त्यांचा आग्रह कोणा एका पक्षाला मते असा नाही तरीही या मोहिमेचा उपयोग भाजपाला झाला आहे येवढेच नव्हे तर उत्तरेत भाजपा विक्रमी मताधिक्क्यांनी निवडून आला आहे. दिल्लीत काही निराळेच प्रयोग पुढे आले तरीही मतदानाची टक्केवारी वाढणे व भाजपालाही वीस पंचवीसटक्के अधिक जागा मिळणे हे मात्र झाले आहे. पुण्यातील आजपर्यंतचा अनुभव असा की, येथे फक्त पन्नास किंवा पंचावन्न टक्के मतदान होते ते यावेळी सत्तरटक्क्याच्या आसपास मतदान झाले तर राजकीय जागृतीची नवी पहाट दिसू लागेल, असे दिसते. पुण्यात यावेळी आप व मनसे यांचेही उमेद्वार उभे राहणार पण त्यांच्या अनामत रकमा जाणे किंवा वाचणे यापेक्षा ते जादा प्रभाव पाडू शकणार नाहीत. अनेक अर्थांनी यावेळची निवडणूक महत्वाची ठरेल असे दिसते. काँंग्रेसच्या वतीने सध्या तरी विनायक निम्हण यांना ‘पुढे जा’ चा सल्ला आहे. विनायक निम्हण यांना चारवेळा विधानसभा निवडणुका यशस्वीपणे लढविण्याचा अनुभव आहे. त्यातील तीन निवडणुका त्यांनी शिवसेनेचे उमेदवार म्हणून जिंकल्या आहेत व एक निवडणूक काँग्रेसचे उमेदवार म्हणून जिंकली आहे. एखादा आमदार जेंव्हा खासदार बनण्यासाठी निवडणूक लढवितो तेंव्हा त्याला एक टर्म तयारीसाठी द्यावी लागते,असाच आजपर्यंतचा अनुभव आहे. तरीही त्यांना जातीय समीकरणाचा आधार मिळू शकतो. काहीही असले तरी यावेळचे देशातील लोकसभा निवडणुकीचे वातावरण हे ‘इंच इंच लढवू’चे आहे आणि त्याच प्रमाणे पुण्याचेही वातावरण ऐरणीवर टिकण्याचे आहे. भाजपाचा उमेदवार आणि काँग्रेसचा उमेदवार यांच्यात निकराची लढाई होईल, असे आज वातावरण आहे.

Leave a Comment