अमेरिकन कंपनीने क्यूब सॅटेलाईटच्या माध्यमातून जगभर मोफत इंटरनेट सेवा पुरविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून या नेटचे नामकरण आऊटरनेट असे केले गेले आहे. न्यूयॉर्कमधील नॉन प्रॉफिट संस्था मिडीया डेव्हलपमेंट इन्व्हेस्टमेंट फंड यांनी हा प्रकल्प हाती घेतला आहे. यामुळे सेन्सॉरशिवाय, जगात कुठेही अगदी दुर्गम भागात आणि एकाकी बेटांवरही लोक इंटरनेटच्या माध्यमातून जगभर जोडले जाऊ शकणार आहेत.
शेकडो क्यूब सॅटेलाईटचा एक समूहच त्यासाठी अंतराळात स्थिर केला जाणार आहे. पृथ्वीवरील हजारो ग्राऊंड स्टेशनमधून या समूहाकडे इंटरनेट डेटा पाठविला जाईल आणि फोन अथवा संगणक असलेला कुणीही कुठूनही त्यावरची माहिती डाऊनलोड करू शकेल. आज जगभरात ४० टक्के लोक इंटरनेटपासून वंचित आहेत. उत्तर कोरियासारख्या राष्ट्रातून इंटरनेटवर सेन्सारशीप आहे. हे लोकही या सेवेचा लाभ घेऊ शकणार आहेत. तसेच सायबेरिया, पश्चिम अमेरिकेतील दुर्गम बेटे आणि आफ्रिकेच्या कानाकोपर्यातील खेडीही या सेवेचा लाभ घेऊ शकणार आहेत.
अर्थात क्यूब सॅटेलाईट अंतराळात पाठविणे आणि तेथे ते स्थिर करणे हे खर्चिक काम आहे. असे सॅटेलाईट पाठविण्यासाठी प्रत्येकी १ ते ३ लाख डॉलर्स खर्च येणार आहे. त्यासाठी आवश्यक निधी गोळा करण्याचे काम सुरू असून पुढच्या उन्हाळ्यात पहिला क्यूब सॅटेलाईट अंतराळात पाठविला जाईल असे सांगितले जात आहे.