३२ रंगी साडी – किमत ५० लाख रूपये

राजस्थानातील साडी विणकर हाजी बादशाह मिया यांनी नगीना मोहरा पद्धतीने विणलेली साडी ग्राहकांच्या कौतुकाचा आणि औत्सुक्याचा विषय बनली असून दिल्लीत आगाखान हॉलमध्ये सुरू असलेल्या हस्तकला प्रदर्शनात ही साडी ठेवली गेली आहे.

या साडीसाठी ३२ रंग वापरले गेले आहेत आणि ती विणण्यासाठी १ वर्ष लागले आहे. साडीची किमत आहे ५० लाख रूपये. राष्ट्रपतींनी या साडीसाठी प्रायोजकत्व केले आहे असेही सांगितले जात आहे. या साडीत ३ प्राथमिक, ३ द्वितीय श्रेणीचे रंग आहेतच पण त्याचबरोबर सहा विविध रंगाच्या पाच विविध छटा, शिवाय पांढरा, काळा रंगही आहे. हे रंग शुद्ध पाण्यात बनविले जातात व त्यामुळे ते पर्यावरणपूरक आहेत तसेच त्वचेसाठीही अतिशय सुरक्षित आहेत.

इतकी महागडी साडी राजघराण्यातील व्यक्तीच घेणार असा जर समज असेल तर तो मात्र या साडीच्या बाबतीत खोटा म्हणावा लागेल. कारण अनेकांकडून या साडीला मागणी आली आहे तशीच जपानमधूनही या साडीला मागणी आली आहे. मात्र साडी विणण्यासाठी वर्षभर जात असल्याने सगळ्या मागण्या लगेच पुर्‍या करणे सध्या तरी अवघड असल्याचे बादशाह सांगतात.

याच प्रदर्शनात बाहशाहमियानी २४ कॅरेट सोन्याच्या जरीची साडी आणि ओढण्याही ठेवल्या आहेत. ओढणीची किमत आहे ५० हजार रूपये तर साडीची किमत आहे ५ लाख रूपये.

Leave a Comment