सीएट टायर्सची आग १२ तासानंतर आटोक्यात

मुंबई- नाहूर रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या सीएट टायर कंपनीच्या गोदामाला रविवारी सायंकाळी लागलेली आग तब्बल १२ तासानंतर आटोक्यात आली. रात्रभराच्या अथक प्रयत्नांनंतर आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. या आगीत गणेश खोपटे हे जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. या आगीची तीव्रता इतकी मोठी होती की त्याच्या ज्वाळा २० मीटर उंचीवर पोहोचल्या होत्या. या आगीमुळे परिसरात धुराचे साम्राज्य पसरल्याने मध्य रेल्वेने नाहूर रेल्वे स्थानकातील थांबा तात्पुरता रद्द केला. दरम्यान, या आगीचे कारण समजू शकले नाही.

सीएट कंपनीच्या टायर गोदामाला सायंकाळी ५.५५ वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीमुळे नाहूर परिसरात धुराचे साम्राज्य पसरले. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना तातडीने सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. या आगीमुळे नागरिकांचे डोळे चुरचुरत होते. मध्य रेल्वेने नाहूर स्थानकात लोकलचा थांबा रद्द केला. डाउन धीम्या मार्गावरील वाहतूक विक्रोळीहून जलदगती मार्गावर वळवण्यात आली. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे २५ बंब आणि ७ पाण्याचे टँकर, ६ रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना झाले.

रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. कंपनीच्या मध्यभागी टायरचे गोदाम असून तेथून स्फोटाचे आवाज येत होते. या आगीचे लोळ ऐरोलीतून दिसत होते. या आगीची माहिती मिळताच राजावाडी रुग्णालयातील डॉक्टरांचे पथक घटनास्थळी रवाना झाले. या दुर्घटनेत भाजलेल्या एका रुग्णास मुलुंड येथील एम. टी. अग्रवाल रुग्णालयात दाखल केले. तो २० टक्के भाजल्याचे उपनगरीय रुग्णालयाच्या अधिक्षिका डॉ. सीमा मलिक यांनी सांगितले.

Leave a Comment