लोकसभेच्या २२ जागांवर मनसे लढणार

मुंबई – राज ठाकरे यांची मनसे लोकसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रात २२ जागा लढवेल असे खात्रीलायक वृत्त आहे. वास्तविक स्वतः राज ठाकरे यांना लोकसभा निवडणुकांत विशेष रस नाही तसेच त्यांच्या आमदार व नेत्यांनाही लोकसभा निवडणुकात उतरण्याची इच्छा नाही मात्र तरीही उमेदवार उभे केले जाणार आहेत. योग्य उमेदवारांच्या निवडीसाठी लवकरच बैठक होत असून त्यात नांवे निश्चित केली जातील.

पश्चिम मुंबईतून काँग्रेसचे मिलींद देवरा यांच्याविरोधात बाळा नांदगांवकर उतरतील तर उत्तर पश्चिम मुंबईतून काँग्रेसच्या गुरूदास कामत यांच्याविरोधात अभिनेते सचिन पिळगांवकर यांना उतरविले जाईल असे समजते. पुण्यातून दीपक पायगुडे यांना तर नाशिकमधून वसंत गीते यांना उमेदवारी दिली जाईल असेही सांगितले जात आहे.

जेथे चौरंगी लढती होत आहेत तेथे मनसेला विजयाची संधी अधिक असल्याचे मनसे नेत्यांचे म्हणणे आहे. आपचे उमेदवार जेथे आहेत तेथे त्यांनी ५० ते ६० हजार मते खाल्ली तरी मनसेचा विजयाचा मार्ग सुकर होईल असेही अंदाज वर्तविले जात आहेत. ठाणे, कल्याण आणि मुंबईच्या अन्य जागांवर मनसे उमेदवार देणार आहे असे अंतर्गत सूत्रांकडून समजते.

Leave a Comment