लालूंच्या पक्षाला भगदाड

लालूप्रसाद यादव यांनी या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राजद आणि लोज पक्ष यांची भक्कम युती करून बिहारमधल्या भरपूर जागा जिंकायच्याच असा प्रयत्न सुरू केला होता. परंतु त्यांच्याच पक्षातल्या काही आमदारांनी ही गोष्ट पचनी पडत नव्हती. कारण कलंकित आमदार-खासदारांच्या संबंधात करण्यात आलेल्या कायद्याचा पहिला दणका लालूप्रसाद यांना बसला, तो राहुल गांधींमुळे बसला आहे. ज्यांनी तुम्हाला जेलमध्ये पाठवले त्यांच्याशी हातमिळवणी कशी करता असा त्यांच्या राजद पक्षातल्या आमदारांचा सवाल होता. पण त्याचे सयुक्तिक उत्तर लालूंनी कधीच दिले नव्हते. परिणामी तेरा आमदारांनी त्यांना शेवटचा रामराम केला. त्यामुळे लालूप्रसाद यांची गणिते कोलमडून पडली आहेत. त्यांनी मोठे गणित मांडले होते. राजद-कॉंग्रेस आणि रामविलास पासवान यांचा लोज पक्ष यांची भक्कम युती करून ते बिहारमध्ये चांगल्या जागा मिळविण्यास उत्सुक होते. अर्थात ती गोष्ट अशक्यही नव्हती, कारण या तिघांची युती झाल्यास चांगली कामगिरी होते असा पूर्वीचा अनुभव आहे. त्यातच ज्यांच्याशी लढा द्यायचा आहे ते नितीशकुमार आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात फूट पडलेली आहे. म्हणजे आपण स्वत: सुसंघटित होत आहोत आणि विरोधक विखुरले जात आहेत. अशा परिस्थितीत लालूच काय पण कोणालाही विजयाची खात्री वाटणारच. परंतु त्यांच्या या विश्‍वासाला लागोपाठ दोन तडे गेले.

त्यांच्या त्रिकुटातील रामविलास पासवान यांनी भाजपाच्या मागे जाण्याचा संकेत दिला, म्हणजे त्रिकुटातला एक पक्ष आपल्या कट्टर शत्रूला जाऊन मिळाला. रामविलास पासवान यांनी भाजपाशी अशी मैत्री करणे ही गोष्ट धक्कादायक आहे आणि त्यामुळे दलीत नेते भाजपाच्या जवळ का जात आहेत, असा अस्वस्थ प्रश्‍न समाजवादी आणि साम्यवादी मंडळी विचारायला लागली आहेत. खरे म्हणजे त्यांनी असे अस्वस्थ होण्याचे काही कारण नाही. रामविलास पासवान हे काही भाजपाच्या जवळ पहिल्यांदा आलेले नाहीत. १९९८ ते २००२ या काळात वाजपेयींच्या सरकारमध्ये मंत्री होते. विशेष म्हणजे दलीत नेते भाजपाच्या जवळ सरकत असल्यामुळे अस्वस्थ झालेल्या समाजवादी मंडळींनी स्वत:च यापूर्वी भाजपाशी कधी ना कधी संगनमत केलेले आहे. पण आज ते अस्वस्थ होत आहेत, कारण दलीत आणि मुस्लीम भाजपाच्या जवळ कदापीही येऊ शकत नाहीत हा त्यांचा लाडका सिद्धांत आज खोटा पडत आहे.

दलीत आणि मुस्लिमांनी भाजपाच्या जवळ येऊ नये म्हणून आजवर त्यांनी केलेले सारे खरे-खोटे युक्तिवाद आज लुळेपांगळे झाले आहेत. लालूप्रसाद यादव यांच्यासारखे नेते तर संपत चालले आहेत. किंबहुना त्यांना संपविण्यासाठी त्यांचेच एकेकाळचे सहकारी आणि आताचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा भरकस प्रयत्न चालला आहे. त्याचाच एक भाग म्हणून काल लालूप्रसादांच्या राष्ट्रीय जनता दलातील तेरा आमदारांनी लालूंना टाटा करून एक दणका दिला. लालूप्रसाद यादव यांच्या राजद पक्षाचे २२ आमदार विधानसभेत आहेत. त्यातले १३ आमदार असे बाहेर पडले तर पक्षात राहिले काय? म्हणजे लालूंचा पक्ष जवळपास संपत आला आहे. लालूंच्या पक्षातील ही फूट केवळ त्यांच्यासाठीच धोक्याचा इशारा आहे असे नाही तर कॉंग्रेस आणि राजद यांच्या युतीलाही तो इशारा आहे. कारण लालूप्रसाद यादव कॉंग्रेसला सोबत घेऊन नितीशकुमार आणि नरेंद्र मोदी या दोघांना शह देऊन मोठा पराक्रम करण्यासाठी उत्सुक होते.

गेल्या दोन निवडणुकांमध्ये राजद आणि कॉंग्रेस यांच्या युतीला मोठे धक्के बसले. या दोन पक्षांनी युती करून निवडणूक लढवली तर चांगल्या जागा मिळतात, असा त्यांचा अनुभव आहे. मात्र २००९ साली कॉंग्रेसच्या नेत्यांना अवदसा आठवली आणि त्यांनी लालूंपासून फारकत घेऊन स्वबळावर निवडणूक लढवली. परिणामी कॉंग्रेसचाही फज्जा उडाला आणि लालूंचाही धुव्वा उडाला. तेव्हापासून या दोघांनी असा धडा घेतला की, दोघांनाही जगायचे असेल तर एकत्र येऊन लढले पाहिजे. त्यात त्यांनी यावेळेस रामविलास पासवान यांनाही सोबत घेऊन लढण्याचा प्रयत्न सुरू केला होता. एका बाजूला ही जमवाजमव छान साधली जात असतानाच या युतीला ज्यांच्याशी लढायचे आहे ती नितीशकुमार आणि भाजपाची युती तुटली आहे. म्हणजे विरोधक विखुरलेले आहेत आणि कॉंग्रेस-राजद एकत्र येत आहेत. या समीकरणामुळे लालूप्रसाद आणि कॉंग्रेस यांना बिहारमध्ये काही तरी चांगले लाभ होणार अशी चिन्हे दिसायला लागली. म्हणूनच लालूप्रसाद यादव, ‘बघतोच एकदा मोदी कसे पंतप्रधान होतात ते’ अशा डरकाळ्या फोडायला लागले होते. मात्र काल त्यांच्या या सगळ्या डरकाळ्या निष्फळ ठरविणार्‍या दोन घटना घडल्या.

राजद-कॉंग्रेस-पासवान या त्रिकुटातील रामविलास पासवान यांनी भाजपाशी हातमिळवणी करण्याचे स्पष्ट संकेत दिले. त्यामुळे लालूंचा एक पाय मोडला आणि मोदींचे पारडे जड झाले. याआधी नितीशकुमार यांचे सहकारी उपेंद्रकुमार कुशवाह यांनी नितीशकुमार यांच्यापासून दूर जाऊन स्वतंत्र पक्ष काढला आणि भाजपाशी युती केली. म्हणजे लालूंचा एक लचका आणि नितीशकुमार यांचा एक लचका तोडून भाजपाने आपली बाजू बळकट केली. भाजपाची बिहारमध्ये स्वत:ची काही ताकद नाही. त्यांनी नितीशकुमार यांच्याशी युती करून सत्ता मिळवली आहे. त्यामुळे बिहारची गणिते मांडताना भाजपाला गृहित धरण्याची गरजच नाही असे राजकीय निरीक्षक मानत होते, पण त्यांना आता हे मान्य करावे लागेल की, बिहारमध्ये भाजपाचे पारडे लालूंपेक्षा जड आहे. लालूंचे पारडे आणखी हलके करण्यासाठी नितीशकुमार यांनी त्यांच्या पक्षात फूट पाडली आणि १३ आमदार ओढून घेतले. लालूप्रसाद आणि नितीशकुमार यांच्यातली ही चढाओढ प्रामुख्याने मुस्लीम मतांसाठी आहे आणि नितीशकुमार हे लालूंपेक्षा अधिक सेक्युलर आहेत असे भासवण्यासाठी ही ओढाताण चालली आहे. ज्या राज्यात मुस्लिमांच्या मतांत ओढाताण आणि संभ्रम निर्माण होतो तिथे भाजपाचा आपोआप फायदा होतो, तसा बिहारमध्ये होणार आहे आणि होत सुद्धा आहे. मतदारांच्या चाचण्यांमध्ये तसे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

Leave a Comment