बजाजची चारचाकी आर ई-६०

पुणे – या वाहनाला चार चाके आहेत, सीट बेल्ट आहेत, ती दिसतेही छोट्या आकाराच्या हचबॅक कारसारखी. पण ती कार नाही. तसेच ती ऑटो रिक्षाही नाही. सरकार या गाडीसाठी नवीन कॅटेगरी निश्चित करत आहे. असे हे आगळेवेगळे वाहन जगातील सर्वाधिक मोठे ऑटोरिक्षा उत्पादक बजाज बाजारात आणत आहेत. मात्र हे वाहन प्रत्यक्षात वापरात येण्यासाठी दोन वर्षे वाट पाहावी लागणार आहे. आर ई ६० असे नांव सध्या या वाहनाला दिले गेले आहे. ४०० किलो वजनाचे हे वाहन रिक्षा पेक्षा थोडे जड आणि कारपेक्षा हलके आहे. यासाठी बजाजने ५५०० कोटींची गुंतवणूक केली असून दर महिना ५ हजार वाहने तयार केली जाणार आहेत.

कंपनीचे संचालक राजीव बजाज सांगतात, कार पेक्षा कमी किमतीत आणि ऑटो रिक्षा पेक्षा थोड्या जास्त किमतीत हे वाहन ग्राहकांना मिळणार आहे. चार चाकांमुळे ते रिक्षापेक्षा अधिक सुरक्षित आहे तसेच स्थिरही आहे. त्याला चार चाके आहेत, चार दारेही आहेत. चांगला टप आहे आणि सीट बेल्टही आहेत. दिवसअखेर रिक्षा चालवून दमलेल्या रिक्षाचालकांसाठी हे वाहन कार चालविल्याचे समाधानही देईल आणि आरामही देईल. जेथे जेथे तीन चाकी वाहने आहेत, त्या मार्केटमध्ये हे वाहन उतरविले जाणार आहे.

भारतात रिक्षाला दारे नसतात. तसेच रिक्षाचे टपही सॉप्ट असते मात्र नवीन वाहन टॅक्सीप्रमाणे वापरात येऊ शकणार आहे. हे वाहन तयार करण्याची योजना फार पूर्वीच आखली गेली होती. गेली दोन वर्षे बजाजच्या वाहन विक्रीत मंदी जाणवत आहे. त्यामुळे देशा परदेशात विक्रीवाढीसाठी या वाहनाचा मोठा फायदा मिळू शकेल असा अंदाज वर्तविला जात आहे. बजाज हे जगातील सर्वात मोठे रिक्षा उत्पादक तर भारतात दोन नंबरचे मोटरसायकल उत्पादक आहेत.तज्ञांच्या मते आर ई ६० ची किमत २ लाख रूपयांदरम्यान असेल.

Leave a Comment