ऑनलाईन रिटेल व्यवसायाची हनुमान उडी

मुंबई- क्रिसिल या संस्थेने रिटेल व्यवसायासंदर्भात नुकत्याच केलेल्या सवेक्षणानुसार २०१६ सालापर्यंत भारतातील ऑनलाईन विक्री व्यवसायाची उलाढाल ५० हजार कोटींवर जाण्याची शक्यता आहे. दरवर्षी हा व्यवसाय ५० ते ५५ टक्के इतक्या वेगाने वाढत चालल्याचेही दिसून आले आहे.

क्रिसिलच्या म्हणण्याप्रमाणे ऑनलाईन विक्री व्यवसाय भारतात अजूनही बाल्यावस्थेतच आहे मात्र त्याची वेगाने वाढ होत चालली आहे. २००७ -८ साली या व्यवसायाची उलाढाल १५०० कोटींची होती ती २०१२-१३ मध्ये १३,९०० कोटींवर पोहोचली आहे. त्याची दरवर्षी ५० ते ५५ टक्यांनी वाढ होत असल्याचे आढळले आहे म्हणजेच २०१६ सालापर्यंत हा व्यवसाय ५० हजार कोटींचा टप्पा गाठेल असा अंदाज आहे. ऑनलाईन खरेदीवर दिले जात असलेले डिस्काऊंट आणि घरपोच व्यवस्था यामुळे ग्राहकांची पसंती या खरेदीला अधिक आहे. त्यात कपडे, पुस्तके, संगीत, इलेक्ट्रोनिक्स वस्तूंचा अधिक खप आहे.

सध्याच्या बाजारात एकूण रिटेल व्यवसायात ऑनलाईन व्यवसायाचा हिस्सा सध्या ८ टक्के इतकाच असून तो २०१६ पर्यंत १६ टक्कयांवर जाईल असा अंदाज आहे. या खरेदीत मिळणार्‍या अन्य फायद्यांमुळे ग्राहकांचा ओढा ऑनलाईन खरेदीकडे आहे व परिणामी रिटेलमधील अनेक पुस्तक तसेच किराणा दुकाने बंद करावी लागली असल्याचेही आढळले आहे.

Leave a Comment