आशिया चषक स्पर्धेला सुरूवात

फतुल्ला (बांगलादेश)- पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात मंगळवारी होत असलेल्या सलामीच्या लढतीने आशिया चषक स्पिर्धेला प्रारंभ झाला आहे. आशिया चषक स्पर्धेत भारताची सलामीची लढत बुधवारी (२६ फेब्रुवारी) यजमान बांगलादेशशी होणार आहे. प्रथमच अशिया चषक मालिका कर्णधार धोनी विना खेळली जात असल्याने सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे.

पाकिस्तानचा संघ या स्पर्धेचा गतविजेता ठरला होता. त्यांनी डिसेंबरनंतर पहिल्यांदाच वनडे क्रिकेट खेळत आहेत. विशेष म्हणजे पाकिस्तानने डिसेंबरमध्ये संयुक्त अरब अमिराती येथे श्रीलंकेविरुद्धची पाच वनडेंची मालिका ३-२ अशी जिंकली. ते पाहता तो आत्मविश्वास त्यांना विजयी सलामी देण्यासाठी उपयोगी पडेल. याउलट श्रीलंकेने नुकतेच बांगलादेशात तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये मालिका विजय नोंदवले आहेत. ते पाहता येथील परिस्थितीशी त्यांनी स्वत:ला जुळवून घेतले आहे.

पाकिस्तानकडे ऑफस्पिनर सईद अजमलसह वेगवान गोलंदाज उमर गुलसारखे प्रभावी गोलंदाज आहेत. मात्र त्यांना कुमार संगकाराला रोखण्याचे मुख्य आव्हान आहे. संगकारा सध्या दमदार फॉर्मात आहे. त्याच्याशिवाय अनुभवी माहेला जयवर्धने आणि अष्टपैलू अॅँआजेलो मॅथ्यूज यांच्यावरदेखील श्रीलंकेची फलंदाजीची भिस्त आहे.दुसरीकडे, अनुभवी अष्टपैलू शाहिद आफ्रिदी तंदुरुस्त झाला आहे ही पाकिस्तानची जमेची बाजू आहे. मजबूत गोलंदाजी असलेला पाकिस्तान फलंदाजीतही फॉर्मात आहे. कर्णधार मिसबा-उल-हक, मोहम्मद हाफीज आणि अहमद शहजाद हे पाकिस्तानचे मुख्य फलंदाज आहेत.

टीम इंडियाची मदार कर्णधार विराट कोहली याच्यावर राहणार आहे. त्याशिवाय सलमीवीर शिखर धवन, रोहित शर्मा यांच्यावर फलंदाजीचे दडपण असणार आहे. कर्णधार धोनीची विकेटकिपरची जागा दिनेश कार्तीक घेत आहे. तर गोलदांजीची मदार झहीर खान व मोहमंद शमी यांच्यावर राहणार आहे.

Leave a Comment