झुकरबर्ग मोबाइल जगताचा नवा किंग

बार्सिलोना- सोशल नेटवर्किंगमध्ये निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित असलेल्या फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गना व्हॉट्सअॅपच्या खरेदीने मोबाइल जगताचाही किंग झाला आहे. येथे सुरू झालेल्या मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये झुकरबर्ग यांच्या कामगिरीची दखल घेण्यात आली. दोन वर्षापूर्वी फेसबुकने समभाग विक्री योजना आणली होती. या वेळी कंपनीच्या महसुलात मोबाइल जाहिरातील महसूल नव्हता. मात्र गेल्या वर्षभरात फेसबुकची कामगिरी अविश्वसनीय असल्याचे ओव्हमचे संशोधक इडेन झॉलर यांनी सांगितले.

आयपीओच्या वेळी फेसबुकचा मोबाइल वापरकर्ता मोठ्या संख्येत होता. मात्र त्याला कायमचे आपल्याकडे वळवण्यात अपयश आल्याचे झॉलर यांनी सांगितले. मोबाइल व्यवसायातून महसूल कमी मिळत असल्याने कंपनीच्या शेअरलाही फटका बसला. फेसबुकच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. मात्र यावर झुकरबर्ग यांनी नव्याने विचार करून आपली कार्यपद्धती बदलली. ज्यामध्ये फेसबुकने मोबाइलकडे अधिकाधिक लक्ष केंद्रित केले.

मोबाइलच्या महसूलवाढीवर विशेष भर दिल्याने फेसबुकने मोबाइल बाजारपेठेतही मुसंडी मारली आहे. व्हॉट्सअॅप खरेदीने कंपनीला इन्स्टंट मेसेंजरचा मोठा युजर मिळणार आहे. डिसेंबरच्या तिमाहीत मोबाइलमधील जाहिरातीचा महसूल एकूण महसुलाच्या ५३ टक्के होता. तर व्हॉट्सअॅपला आपल्यात समाविष्ट केल्याने महसुलात मोठी वाढ होईल, असा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Comment