राज्यातील ३० टोल नाके बंद करण्याची घोषणा हवेतच

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात आता टोलधाडीवरुन विरोधकांनी सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. त्याचा भाग म्हणून सोमवारी विधानभवनाबाहेर तसेच विधानभवनात विरोधकांनी टोलमुक्तीसाठी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली आहे. त्यामुळे आता आगामी काळात राज्यसरकार राज्याातील ३० टोल नाके बंद करण्याची घोषणा करणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काही दिवसांपूर्वी झालेल्या मनसेच्या आंदोलनानंतर व राज ठाकरे यांच्या सोबतच्या चर्चेनंतर राज्यातील २० ते २५ कोटींपर्यंतच्या रस्त्यावरचे ३० टोल बंद करु अशी घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी केली होती. मात्र आता मुख्यमंत्री शब्द फिरवतायत का असा प्रश्न पडतो आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी थेट टोल बंद करु असे न सांगता टोल धोरणाचा विचार करु असे उत्तर दिले आहे.

आगामी काळात राज्यातील ३० टोल बंद करण्याची सरकारची घोषणा हवेतच विरते का असा प्रश्न पडला आहे. अजूनतरी मुख्यमंत्री बघू करु अशी भूमिका घेत आहेत. खरे तर सरकारच्या या घोषणेला दोन आठवडे उलटून गेले. त्यावर आतापर्यंत कुठलाच निर्णय़ झाला नाही. त्यामुळे सरकारच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment