महाराष्ट्रासह पाच राज्यातील वीज बिले वाढणार

नवी दिल्ली- केंद्रीय वीज नियामक आयोगाच्या निर्णयानंतर महाराष्ट्रासह पाच राज्यातील वीज बिले लवकरच वाढण्याची शक्यता आहे. मुंद्रा येथे टाटा पॉवर कंपनीने चार हजार मेगावॉट वीज प्रकल्प उभारला आहे. टाटा पॉवरला या प्रकल्पात झालेले ३२९.४५ कोटी रुपयांचे नुकसान भरून देण्यासाठी केंद्रीय वीज नियामक आयोगाकडून वीज दरवाढीची शक्यता आहे. एक एप्रिल २०१३ पूर्वी प्रति किलोवॅट ०.५२४ रुपये दराने नुकसान भरपाई दिली जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरयाणा व पंजाबमधील वीज दरवाढ वाढणार आहेत.

आम्ही केंद्रीय वीज नियामक आयोगाच्या निकालाचा अभ्यास करीत असून त्यानंतर याबाबतचा निर्णय घेऊ. या आदेशाची अंमलबजावणी करायची झाल्यास आमच्यावर प्रति युनिट ४५ ते ५० पैशाचा भार पडेल, असेही महावितरणच्या प्रवक्त्याने सांगितले. या प्रकल्पात वापरण्यात येणारा कोळसा इंडोनेशियातून आयात केला जातो. त्याचा दर अधिक असल्याने वीजेच्या दरात वाढ करण्याची मागणी टाटा पॉवरने केंद्रीय वीज नियामक आयोगाकडे केली. टाटा पॉवरची उपकंपनी असलेल्या कोस्टल गुजरात पॉवर लिमिटेडतर्फे २.२६ रुपये युनिट दराने पाच राज्यांना वीज पुरवली जाणार आहे.

Leave a Comment