बिहार; राजकारणाला निर्णायक वळण

देशाच्या राजकारणात काय घडणार याचा निर्णय उत्तर प्रदेश आणि बिहारवरून होत असतो. त्यामुळे या दोन राज्यातल्या राजकारणात काय घडत आहे. याविषयी सर्वांना उत्सुकता असते. आता तर या दोन्हीही राज्यात विलक्षण राजकीय घडामोडी घडत आहेत. बिहारमध्ये रामविलास पासवान हे भारतीय जनता पार्टीशी युती करत आहेत. लोकसभेच्या ४० जागा असलेल्या बिहारच्या राजकारणाला या युतीमुळे नाट्यमय वळण लागले आहे. बिहारमधल्या तिरंगी राजकारणात नितीशकुमार यांचे असलेले वर्चस्व नष्ट झाले असून भाजपाची सरशी झाली आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी एकेकाळी मोदींच्या विरोधात कठोर भूमिका घेतली होती. मोदी यांना भाजपाने पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर केल्यास आपण भाजपाशी असलेली युती मोडू अशी धमकी त्यांनी दिली होती. ते बिहारचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी बिहारमध्ये चांगले काम केलेेले आहे. लालूप्रसाद यादव यांनी बिहारवर १५ वर्षे राज्य करून जे जंगलराज निर्माण केले होते ते नितीशकुमार यांनी स्वच्छ केले. मात्र त्यांना हे सारे भाजपाशी युती केल्यामुळे शक्य झाले. त्यांना त्याचे भान राहिले नाही आणि त्यांनी भाजपाला सूचना करायला सुरूवात केली. मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून भाजपाने पुढे करू नये म्हणून असा हट्ट तर त्यांनी धरलाच.

निवडणुकीच्या काळात मोदींनी बिहारमध्ये प्रचाराच्या सभासुध्दा घेऊन नयेत तशा त्या घेतल्या तर आपण भाजपाशी असलेली युती मोडू असा इशारा त्यांनी दिला. भाजपाचे नेते केंद्रात सत्ता काबीज करण्यासाठी बरेच घायकुतीला आलेले आहेत. त्यामुळे बिहारसारखे मोठे राज्य आपल्या हातून कशाला गमवायचे म्हणून त्यांनी नितीशकुमार यांच्यासमोर नमते घेतले. त्यामुळे तर नितीशकुमार यांना भलताच जोर चढला. शेवटी ही युती मोडली. नितीशकुमार भाजपाच्या कचाट्यातून मुक्त झाले. म्हणून ते कॉंग्रेसशी युती करतील की काय अशी शक्यता वाटायला लागली. एवढेच नव्हे तर तिसर्‍या आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची चर्चासुध्दा सुरू झाली. मात्र गेल्या महिन्याभरात बिहारमधले राजकारण असे काही बदलून गेले आहे की नितीशकुमार कुठल्या कुठे अडगळीला पडले आहेत. बिहारच्या राजकारणाने अशी काही वळणे घेतली आहेत की भाजपाशी असलेली युती मोडण्यात आपण मोठी चूक केली असे त्यांना आत वाटावे. भाजपाने नरेंद्र मोदी यांच्यासाठी नितीशकुमार यांच्याशी असलेली युती मोडून स्वतःचे नुकसान करून घेतले की काय अशी चर्चा सुरू असतानाच नरेंद्र मोदींच्या सभांनी देशाच्या राजकारणात एक वेगळा प्रवाह निर्माण केला आणि बघता बघता बिहारमध्ये नरेंद्र मोदी आणि भाजपा ही मोठी शक्ती असल्याचे दिसून आले.

बिहारमधले राजकीय युध्द नितीशकुमार एका बाजूला आणि लालूप्रसाद दुसर्‍या बाजूला अशी होण्याची चिन्हे दिसत होती. लालूप्रसाद यांनी तशी तयारीसुध्दा सुरू केली होती. आपला राजद पक्ष, कॉंग्रेस पक्ष आणि रामविलास पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष या तिघांना एकत्र आणून नितीशकुमार यांच्या प्रभावाला शह देण्याची तयारी त्यांनी सुरू केली. आपले बिहारच्या राजकारणावर अजूनही वर्चस्व आहे असा त्यांचा दावा आहे. त्यामुळेच त्यांनी कॉंग्रेस आणि रामविलास पासवान या दोघांनाही गृहित धरून पूर्वीप्रमाणेच एकतर्फी जागा वाटप सुरू केले. या एकतर्फी व्यवहाराचे आणि लालूशाहीचे कॉंग्रेसच्या नेत्यांना काहीच वाटत नाही. कारण त्यांना कसले भवितव्यच नाही. परंतु रामविलास पासवान यांना मात्र या लालूशाहींनी एकदमच विचलित झाले. २००९ च्या निवडणुकीत लालूप्रसादांनी त्यांना अशाच एकतर्फी ९ जागा सोडल्या होत्या. आता मात्र पासवान यांना बारा जागा हव्या आहेत आणि त्यांना तशा त्या देऊन लालूप्रसाद कमीपणा घ्यायला तयार नाहीत. याही संबंधातल्या वाटाघाटी फार सावकाशीने सुरू होत्या. त्यामुळे रामविलास पासवान यांनी लालूप्रसाद यादव या आपल्या जुन्या सहकार्‍याला सरळ सरळ टांग मारली आणि भाजपाशी हातमिळवणी करण्याचा प्रस्ताव मांडला.
या राजकारणामुळे लालूप्रसाद यादव यांचा चेहरा बघण्यासारखा झाला आहे. कारण या आधीच बिहारमध्ये करण्यात आलेल्या मतदारांच्या चाचण्यामध्ये भाजपाचे वर्चस्व दिसून आले होते. दोन महिन्यापूर्वी केलेल्या पाहणीत भाजपाला २३ टक्के मते मिळतील असा अंदाज व्यक्त झाला होता. परंतु नुकत्याच केलेल्या पाहणीमध्ये ही टक्केवारी ३९ वर गेली आहे. मोदी इफेक्ट कसा आहे याचे हे द्योतक आहे. आता पासवान आणि मोदी यांची युती झाल्यास चित्र यापेक्षाही अधिक अनुकूल ठरेल. पासवान यांच्या या चालीमुळे नितीशकुमार आणि लालूप्रसाद हे दोघेही बाजूस पडले आहेत. नितीशकुमार यांचे नजिकचे सहकारी उपेंद्रकुमार कुशवाह यांनीही नितीशकुमार यांची साथ सोडून भाजपाशी हातमिळवणी केली आहे. कुशवाह जातीची ६ टक्के मते बिहारमध्ये आहेत. नितीशकुमार यांनी भाजपाशी असलेली युती मोडली त्यामुळे त्यांचे सरकार गेले नाही. परंतु भाजपाशी केलेल्या युतीमुळे जी सामाजिक समीकरणे विचलित झाली ती नितीशकुमार यांच्या विरोधात जाणारी आहेत. हे आता लक्षात यायला लागले आहे. एकेकाळी ज्यांच्या नावाची चर्चा पंतप्रधान पदाचे उमदेवार म्हणून सुरू झाली होती ते बिहारच्या राजकारणात आता अक्षरशः अडगळीला पडले आहेत. धड कॉंग्रेसशी युती नाही, धड भाजपाशी मैत्री नाही आणि स्वतःच्या पक्षात मोठे विघटन सुरू झालेले अशा अवस्थेत नितीशकुमार आता सापडले आहेत.

Leave a Comment