पाकिस्तानात ३८ दहशतवादी ठार

इस्लामाबाद – पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवरील पाकिस्तानच्या वायव्य भागातील खैबर या आदिवासीबहुल भागात लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यात ३८ दहशतवादी ठार झाले. तालीबान संघटना आणि सरकार यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली शांततेची बोलणी अनिर्णित अवस्थेत संपल्यानंतर झालेल्या या पहिल्याच घटनेत खैबर भागातील तिराह व्हॅलीमध्ये लपलेल्या अतिरेक्यावर हल्ला करण्यात आला.

ठार झालेले अतिरेकी तालीबानी संघटनेच्या तेहरिक ए तालीबान या संघटनेचे आहेत. त्यांनीच गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी लष्कराच्या २३ जवानांना ओलीस ठेवले होते आणि गेल्याच आठवड्यात त्या सर्वांना ठार मारले होते. या घटनेमुळे चिडलेल्या लष्करी अधिकार्‍यांनी या दहशतवाद्यांना धडा शिकवायचे ठरवले आणि त्यांच्या लपण्याच्या जागांवर हवाई हल्ले करून ३८ जणांना यमसदनास पाठविले.

या हल्ल्यांमध्ये दहशतवाद्यांचे सहा अड्डे उद्ध्वस्त झाले. त्याचबरोबर त्यांची काही म्होरके सुद्धा मारले गेले. या लपण्याच्या जागांवर दडवलेले स्फोटक साहित्यही उद्ध्वस्त झाले. दोनच दिवसांपूर्वी उत्तर वजिरीस्तानमध्ये नऊ जणांची अशी हत्या करण्यात आली होती. लष्कराच्या या मोहिमेमध्ये गेल्या आठवडाभरात ६० अतिरेकी मारले गेले आहेत.

Leave a Comment