ड्रग माफिया जोआकिन गझमनला अखेर अटक

वॉशिग्टन – गेली १३ वर्षे ज्याच्या अटकेसाठी अमेरिकेने जंग जंग पछाडले तो जगातील ड्रग व्यवसायाचा बडा खिलाडी जोआकिन एल चापो गझमन याला अखेर मेक्सिकोतून अटक करण्यात आली आहे. अमेरिकेचे अॅटर्नी जनरल एरिक होल्डर यांनी हे फारच मोठे यश असल्याचे मत व्यक्त केले आहे. गझमन याची माहिती देणार्‍यास अमेरिकेने ५० लाख डॉलर्सचे बक्षीस  जाहीर केले होते. मेक्सिकोच्या नौसेनेने गझमन याला पॅसिफिकच्या किनार्‍यावर असलेल्या मझाल्टन रिसॉर्टमधून एकही गोळी न झाडता ताब्यात घेतले.

५६ वर्षीय गझमन याला पकडण्यासाठी गेली १३ वर्षे सतत प्रयत्न सुरू होते. अमेरिका आणि मेक्सिकोच्या परस्पर सहकार्याने ही अटक शक्य झाल्याचे एरिक होल्डर यांनी सांगितले. ते म्हणाले की याच सहकार्यातून जगातील सर्वात मोठी ड्रग माफिया संघटना सिनालो कार्टलच्या सदस्यांना पकडणे शक्य झाले आहे. अमेरिकेसह युरोप, आशिया आणि पॅसिफिक क्षेत्रात त्यांचे साम्राज्य होते.

गझमन याच्यावर मादक पदार्थांवरून हिंसा पसरविण्याचा आरोपही ठेवला गेला आहे. मेक्सिकोत या मादक पदार्थ तस्करींवरून नेहमीच हिसाचार होत असून गेली अनेक वर्ष येथील नागरिक या हिंसाचारामुळे त्रस्त झाले होते. गझमनची अटक हा मेक्सिको आणि अमेरिकेतील नागरिकांचा विजय आहे असेही होल्डर यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment