आशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडिया रवाना

ढाका – गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाला पराभवांचा सामना करावा लागत असल्याने सर्वस्तरातून टीका केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर टीम इंडिया आता ‘मिशन आशिया कप’ यशस्वी करण्यासाठी रविवारी रात्री बांगलादेशला रवाना झाली आहे. मंगळवारपासून आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या स्पर्धेसाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची कस लागणार आहे.

दरम्यान, जखमी धोनीच्या जागी विराट कोहली स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. तसेच धोनीच्या जागी दिनेश कार्तिककडे यष्टिरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली. यावेळी बोलताना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली म्हणाला, ‘आगामी काळात होत असलेली अशिया चषक क्रिकेट स्पर्धा जिंकण्याचा आम्ही निर्धार केला आहे. परदेशात गेल्या काही दिवसांपासून आमची कामगिरी चांगली झाली नाही. त्यामुळे हा कप जिंकून परदेशातील अपयशी मालिका खंडीत करायची आहे. टीम इंडियाला म‍हेंद्रसिंग धोनीची कमतरता भासणार असून त्याची उणीव संघाला जाणवणार आहे.’

अशिया कप स्पर्धेत टीम इंडियाचा पहिला सामना बुधवारी यजमान बांगलादेशाशी होईल. त्यानंतर २८ फेब्रुवारीला भारतासमोर श्रीलंकेचे आव्हान असेल. दोन मार्चला भारत आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान समोरासमोर असतील. भारत-अफगाणिस्तान सामना पाच मार्चला होणार आहे. त्यामुळे आगामी काळात टीम इंडियाची कस लागणार आहे.

Leave a Comment