‘आता राष्ट्रवादीचे दोन नेते फोडणार ‘ – मुंडेंचा एल्गार

मुंबई – शिवसेनेच्या वाकचौरे आणि गणेश दुधगावकर या दोन खासदारांना राष्ट्रवादीने फोडल्याचा घाव महायुतीच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे डोंबिवलीतल्या सभेत भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी ‘ आता या आठवड्यात आपणही राष्ट्रवादीचे दोन नेते फोडून महायुतीत आणणार,’ असं सांगत राष्ट्रवादीविरोधात एल्गार पुकारला आहे. इचलकरंजीतल्या पहिल्या सभेनंतर महायुतीची डोंबिवलीत दुसरी जाहीर सभा झाली. या सभेत गोपीनाथ मुंडे यांनी राज्यातल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकावर हल्ला चढवला.

‘ आघाडी सरकारने गुन्हेगारीत महाराष्ट्राचा बिहार केला आहे, असा आरोप मुंडे यांनी केला. अख्खा महाराष्ट्र माफियांनी पोखरून काढलाय, असं सांगत मुंडेंनी गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्यावरही टीका केली. ‘ मंत्रालयाला आग लागली नाही तर लावली गेली आहे. महायुतीचं सरकार आल्यानंतर या आगीमागच्या दोषींना तुरूंगात टाकल्याशिवाय राहणार नाही,’ असा निर्धार मुंडेंनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ऊर्जा खात्यात मोठा भ्रष्टाचार केला आहे. सिंचनापेक्षाही महाराष्ट्रात ऊर्जा खात्यात सर्वात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे ऊर्जा खात्यातील भ्रष्टाचारावर एसआयटी चौकशी मागणी विधिमंडळात लावून धरू,’ अशी असं मुंडे म्हणाले.

टोलमुक्त महाराष्ट्र हा महायुतीचा अजेंडा असल्याचा पुनरुच्चारही मुंडेंनी केला. ‘ युती सरकारच्या काळात राज्यावर ७५ हजार कोटींचं कर्ज होतं. मात्र, या आघाडी सरकारनं वाटोळ करत राज्यावर २ लाख ७१ हजार कोटींचं कर्ज केलं आहे,’ अशी टीका मुंडेंनी केली. गेल्या दहावर्षात आघाडी सरकारने राज्यात वरवंटा फिरवला आहे, असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ज्या पद्धतीने राज्य कारभार चालवत आहे ते पाहता ते बाबा नव्हेत तर भोंदू बाबा आहेत, असं अशी बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

Leave a Comment