ही तर आपची गुंडगिरीच

आम आदमी पार्टी आणि राष्ट्रवादी कॉंगे्रस यांच्यात सध्या सुरू असलेला संघर्ष पाहिल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीत असे बरेच संघर्ष सुरू होण्याची शक्यता वाटायला लागली आहे. या राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आक्रमकपणा आणि आम आदमी पार्टीची लोकांवर बेसुमार आरोप करण्याची बेजबाबदार वृत्ती यातून हा संघर्ष निर्माण झाला आहे आणि आजपर्यंत तरी आम आदमी पार्टीचे नेते आपल्या या बेफाटपणावर पुनर्विचार करण्याच्या मनःस्थितीत आलेले नाहीत. त्यामुळे हा संघर्ष निर्माण झाला आहे आणि तो कमी होण्याची शक्यता नाही. आम आदमी पार्टीच्या कार्यालयावरील राष्ट्रीवादीचे हल्ले आणि त्यांची हकीकत या पक्षाच्या नेत्यांनी टी. व्ही. वरून सर्वांना सांगितली आहे. ती शंभर टक्के अशीच आहे असे नाही. तिच्यात काही बदलसुध्दा आहेत. काही गोष्टी अर्धवट सांगितलेल्या आहेत आणि काही गोष्टी चुकीच्या सांगितलेल्या आहेत. आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आणि नेते स्वतःला मोठे निरपराध आणि निष्पाप दाखवत असतात. आपण तर बिचारे लोकशाही मार्गाने आणि सभ्यपणाने विरोध करत असतो परंतु राष्ट्रवादीचे गुंड त्यांच्या पध्दतीने वागतात आणि हिंसाचार करतात असे आम आदमी पार्टीच्या अंजली दमानिया यांचे म्हणणे आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांचा युक्तीवाद वेगळा आहे. तो समजून घेतला पाहिजे. राष्ट्रवादी म्हणजे गुंड आणि आम आदमीवाले म्हणजे सभ्य अशी सरळ सरळ विभागणी करण्याचा प्रयत्न दमानिया यांनी केला असला तरी त्यावर फारसा कोणाचा विश्‍वास बसणार नाही. या ठिकाणी गुंडगिरी शब्दाच्या व्याख्या वेगवेगळ्या कराव्या लागतील. हातात दंडुके घेऊन कोणाच्या घरावर किंवा कार्यालयावर हल्ले करत सुटतात तेच तेवढे गुंड असतात आणि अशा प्रकारची कामे अहिंसात्मक पध्दतीने म्हणजेच हातात लाठ्या, काठ्या न घेता करतात ते सारे साव असतात असे काही नाही. हातात काठी न घेतासुध्दा गुंडगिरी करता येते. आम आदमीच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदांमध्ये निराधार आरोप करून आणि नंतर हातात झाडू घेऊन अशीच दादागिरी सुरू केली आहे आणि म्हणूनच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या झाडूच्या गुंडगिरीला उत्तर देताना काठीचा वापर केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते असे काही करतील असे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना वाटले नव्हते आणि त्यांनी अजित पवार यांच्यावरच्या आरोपाला अशा प्रकारे उत्तर द्यावे असा आदेश त्यांना काही पक्षाने दिलेला नव्हता. पण तरीही त्यांनी स्वयंस्फूर्तीने हा कायक्रर्म हाती घेतला आणि आम आदमीच्या कार्यालयावर हल्ला केला.

अशा प्रकारच्या हल्ल्याचा कोणीही निषेधच करील आम्हीही तो करत आहोत. किंबहुना राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनीसुध्दा त्याचा निषेध केलेला आहे. पक्षाचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी स्वयंस्फूर्तीने आंदोलन करणार्‍या या युवक नेत्यांना पक्षातून निलंबितसुध्दा केले आहे. असे आहे म्हणून अंजली दमानिया यांच्या गटाने किंवा आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आपली आरोपबाजी आवरूच नये असे काही नाही. त्यांनीसुध्दा आपण निवडणुकीच्या तोंडावर काय बोलत आहोत आणि जे काही बोलत आहोत ते तर्कशुध्दपणे बोलत आहोत की नाही याचा विचार केला पाहिजे. एका वृत्तवाहिनीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी अंजली दमानिया यांच्या पतीवर काही आरोप केला तो आरोप खोटा आहे असे अंजली दमानिया यांचे म्हणणे होते. पण तो आरोप होताच त्या इतक्या चवताळल्या की चर्चेतून उठून बाहेर निघून गेल्या. त्यांना त्यांच्यावर केलेल्या एका निराधार आरोपाचा एवढा राग आला मात्र आपण दुसर्‍यावर असेच आरोप करतो त्यांना किती राग येत असेल याचा विचार करायला त्या तयार नाहीत. त्या मात्र लोकांवर सरसकट खोटे आरोप करत असतात, त्या आरोपांचे पुरावे मागितल्यास ते त्यांच्याकडे नसतात आणि त्या ज्यांच्यावर आरोप करतात त्यांचा खुलासा सुध्दा त्या ऐकून घेत नाहीत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयावर हल्ला केला ही गुंडगिरी आहेच पण अंजली दमानिया यांची ही निराधार आरोप करण्याची पध्दत ही गुंडगिरीपेक्षा कमी नाही. गंमतीचा भाग म्हणजे त्यांची ही गुंडगिरी एवढी निरंकुश असते की तिच्याबद्दल त्यांना कोणी प्रश्‍न विचारलेलासुध्दा आवडत नाही. आम आदमीचे नेते आरोप करतात म्हणजे तो खराच असतो आणि लोकांनी तो खरा समजलाच पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो. ते आरोप करतात पण ज्याच्यावर आरोप करतात त्याला खुलासा करण्याची संधी देत नाहीत. आज निराधार आरोप करतात ते सिध्द होण्याच्या आतच त्या आरोपाबद्दल त्याचा राजीनामा मागतात आणि राजीनामा न दिल्यास त्या आरोपाबद्दल त्या व्यक्तीच्या विरोधात आंदोलनही सुरू करतात. आपणच स्वतः आरोप करणे आणि तो आरोप सिध्द न करताच आंदोलन सुरू करणे ही आम आदमी पार्टीची खास कार्यशैली आहे. सगळ्या प्रकारच्या व्यवस्था बदलून टाकण्याचा त्यांचा इरादा आहे. तसा भ्रष्टाचाराच्या आरोपाच्या बाबतीतसुध्दा न्याय व्यवस्थेशिवाय न्याय देण्याचा त्यांचा इरादा दिसत आहे. मात्र ही अजब न्याय व्यवस्था त्यांच्या पक्षाला लागू होता कामा नये असे त्यांचे म्हणणे असते. ही गुंडगिरीच आहे.

Leave a Comment