सुंदर फुलपाखरांचे पहिलेवहिले उद्यान

भुवनेश्वर – जगप्रसिद्ध नंदनकानन अभयारण्यात फुलपाखरांसाठी देशातील पहिलेवहिले उद्यान उभारले गेले आहे. नंदनकानन अभयारण्यातील बोटॅनिकल गार्डनजवळ ३२०० चौरस मीटर परिसरातील या उद्यानाचे उद्घाटन ओरिसाचे वन आणि पर्यावरण मंत्री विजयश्री राऊतेर यांच्याहस्ते करण्यात आले.

या खुल्या उद्यानात ५४ विविध जातींची फुलपाखरे दिसतील असे सांगितले जात आहे. उद्यानाची विभागणी ब्रिडींग विभाग आणि व्हिजिटर्स विभाग अशी केली गेली आहे. बँडेड पिकॉक, क्रिमसन रेड, ब्लयू मॉरमन, कमांडर, वाँडरर, ग्रास डेमॉन, मानेकी पझल या व अशा जातीची अनेक फुलपाखरे आणि पतंग वन्यजीव प्रमींसाठी महत्त्वाचे आकर्षण ठरणार आहेत.

हे उद्यान प्रामुख्याने भेट देणार्‍या प्रेक्षकांत पर्यावरणात फुलपाखरे किती महत्त्वाची भूमिका बजावतात या संबंधी जागृती करण्यासाठी उभारले गेले आहे. आपली इकोसिस्टिम अगदी नाजूक अवस्थेत पोहोचली असल्याने तिचे संरक्षण करणे गरजेचे आहे . त्यासाठी फुलपाखरांची मोठीच मदत होणार आहे. या उद्यानासाठी ३० लाख रूपये खर्च केला गेला आहे. फुलपाखरांचे हे उद्यान रोझ गार्डनजवळच उभारले गेले आहे. त्यामुळे अधिक संख्येने फुलपाखरे येण्यास मदत होणार आहे. येथे चिखलाचे तळे, दोन सुंदर सरोवरे आणि कृत्रिम झरेही निर्माण करण्यात आले आहेत. विविध प्रकारच्या ५६ जातींची झाडेही येथे लावण्यात आली आहेत.

Leave a Comment