मुशर्रफ यांची याचिका फेटाळली

इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी लष्करी न्यायालयात त्यांच्यावरील देशद्रोह आरोपासंदर्भातली केस चालविली जावी यासाठी विशेष न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. न्यायाधीश फैसल अरब यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय पिठाने ही याचिका फेटाळताना मुशर्रफ यांना ११ मार्च रोजी न्यायालयात हजर होण्याचे आदेशही दिले आहेत. या संबंधी मिळालेल्या माहितीनुसार मुशर्रफ यांच्या वकीलांनी मुशर्रफ हे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख होते व त्यामुळे त्यांच्या विरोधातील देशद्रोहाचा खटला लष्करी न्यायालयातच चालविला जावा अशी याचिका दाखल केली होती. त्यावरचा निर्णय खंडपीठाने १८ फेब्रुवारी रोजी राखून ठेवला होता. या दिवशी ७० वर्षीय मुशर्रफ प्रथमच न्यायालयात हजर झाले होते आणि त्यांना कडक सुरक्षेत न्यायालयात आणले गेले होते. २००७ साली देशात आणीबाणी लागू करणे आणि सर्वोच्च न्यायाधीशाना नजरकैदेत ठेवण्याचे आरोप मुशर्रफ यांच्यावर असून त्यासाठी देशद्रोहाचा खटला दाखल केला गेला आहे. मुशर्रफ या खटल्यात दोषी ठरले तर त्यांना जन्मठेप अथवा फाशीची शिक्षा होऊ शकते.

Leave a Comment