ओबामा दलाई लामांना भेटाल तर…

वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांची भेट घेणार असल्याचे जाहीर झाल्यापासून चीनने थयथयाट सुरु केला आहे. ओबामा यांनी दलाई लामांबरोबरची नियोजित भेट रद्द करावी अशी मागणी चीनने केली आहे. अमेरिकेने चीनच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप केला तर त्याचे व्दिपक्षीय संबंधांवर गंभीर परिणाम होतील असा इशारा चीनने अमेरिकेला दिला आहे. दलाई लामा यांच्या फुटीरतवादी भूमिकेला अमेरिकेने अजिबात थारा देऊ नये. आम्हाला वाटणा-या चिंता अमेरिकेने गांर्भीयाने घ्याव्यात असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हूआ चुनियंग यांनी म्हटले आहे.

अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या प्रवक्त्या कॅटलीन हेडन यांनी गुरुवारी ओबामा आणि दलाई लामा यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट होणार असल्याचे जाहीर केले होते. दलाई लामा आंतरराष्ट्रीय स्तरावरील धार्मिक आणि सांस्कृतिक नेते असून, ओबामा त्यांची भेट घेणार आहेत असे कॅटलीन हेडेन यांनी सांगितले होते. दलाई लामा यांच्या आंतरराष्ट्रीय नेत्यांबरोबरच्या बैठकांना चीनने नेहमीच कडाडून विरोध केला आहे. यावेळी चीनची मजल थेट अमेरिकेला इशारा देण्यापर्यंत गेली आहे. ७८ वर्षीय दलाई लामा यांनी १९५९ पासून भारतात आश्रय घेतला आहे.

Leave a Comment