आयपीएलला सुरक्षा शक्य नाही : केंद्रीय गृहमंत्री

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणूकांमुळे इंडियन प्रिमीयर लीगच्या सामन्यांना पुरेशी सुरक्षा देणे शक्य नसल्याचे केंद्र सरकारने शुक्रवारी स्पष्ट केले. सार्वत्रिक निवडणूकांमध्ये आयपीएलच्या सामन्यांना पुरेशी सुरक्षा देता येणार नाही असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितले. सार्वत्रिक निवडणूकीनंतरच आयपीएलला पुरेशी सुरक्षा देण्याची तयारी केंद्रीय गृहमंत्रालयाने दाखवली आहे. बीसीसीआयला तसे कळवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

मे च्या मध्यापर्यंत लोकसभा निवडणूकीचा निकाल येऊ शकतो. त्यामुळे यंदाचा आयपीएलचा मोसम परदेशात होण्याची शक्यता वाढली आहे. यापूर्वी २००९ च्या लोकसभा निवडणूकीच्यावेळी आयपीएलचे सामने दक्षिण आफ्रिकेमध्ये झाले होते. नऊ एप्रिल ते तीन जून दरम्यान आयपीएलचे सामने होणार आहेत आणि याच काळात वेगवेगळया टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक होणार आहेत. देशात अनेक संवेदनशील भाग असल्याने, तेथे मोठया प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात ठेवावा लागणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने निवडणूकीसाठीच्या सुरक्षा बंदोबस्ताची तयारी सुरु केली आहे असे सूत्रांनी सांगितले.

Leave a Comment