मारूतीची सर्वात महागडी कार भारतात येणार

दिल्ली – गेला कांही काळ बाजारातील आपला हिस्सा टिकवून ठेवण्यासाठी धडपडत असलेल्या मारूती सुझुकी इंडियाने नवीन मॉडेल भारतीय बाजारात आणण्याची जोरदार तयारी सुरू केली असल्याचे वृत्त आहे. ही कार साडेनऊ ते साडेबारा लाख रूपये किमतीची असेल आणि मारूतीच्या सध्याच्या मॉडेलमधील सर्वात महाग मॉडेल असेल असे समजते. दसरा दिवाळी सणाच्या वेळी ही कार भारतीय बाजारात दाखल होईल असे सांगितले जात आहे.

हे नवे मॉडेल सियाझ या मॉडेलच्या प्लॅटफॉर्मवरच तयार केले जाणार आहे. ऑटो एक्स्पो २०१४ मध्ये सियाज सादर केली गेली होती. नवे मॉडेल होंडाच्या सिटी आणि हुंदाईच्या वेरनाशी स्पर्धा करेल. मारूतीची आत्ताची सर्वात महाग गाडी एसएक्स फोर ही असून तिची किमत आहे ९ लाख रूपये.

२०१७ पर्यंत मारूती सुझुकी १२ नवीन मॉडेल्स भारतात आणत असून त्यातील कांही पूर्णपणे नवी असतील तर कांही जुन्यात थोडे मॉडिफिकेशन केलेली असतील असेही समजते. नुकत्याच सादर केलेले सिलेरियोला ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून दररोज किमान १ हजार गाड्यांची मागणी नोंदविली जात आहे असेही समजते.

Leave a Comment