मनसेकडून खारेगाव टोलनाक्याची तोडफोड

ठाणे- ठाण्यातील खारेगाव येथील टोलनाक्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी तोडफोड केली. विशेष म्हणजे ही तोडफोड करताना पक्षाचे प्रमुख राज ठाकरे तेथे उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांनी राज्यातील टोलविरोधात आंदोलन सुरु केले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची झालेल्या बैठकीनंतर टोलविरोधी आंदोलन स्थगित केले होते. मात्र गुरुवारी अचानक मनसेच्या कार्यकर्त्यांनी खारेगाव येथील टोल नाक्याची तोडफोड केली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाक्यावरील केबीन आणि संगणक फोडले आहेत. या टोलनाक्यावर पोलिस बंदोबस्त असताना ही घटना घडली आहे. दरम्यान पोलिसांनी मनसेच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

मनसैनिकांना पोलिसांचा चोप
महिला पदाधिकाऱ्याशी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी वाद घातल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोर मनसैनिकांनी खारेगावचा टोलनाका फोडला. पण बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी टोलनाका फोडणाऱ्या मनसैनिकांवर लाठीमार करत चोप दिला. या प्रकारानंतर राज ठाकरे टोल न भरताच नाशिकला रवाना झाले. टोल देण्यास नकार दिल्याने खारेगाव येथील टोलनाक्यावरील अधिका-यांनी मनसेच्या महिला पदाधिक-यांनी असभ्य वर्तन केल्याची घटना घडलीय. कल्याणमधील मनसेच्या पदाधिकारी कल्पना कपोते यांनी टोल देण्यास नकार दिल्यानंतर टोलवरील अधिकारी आणि कपोते यांच्यात वाद झाला.

कल्याणमधील कल्पना कपोते या मनसेच्या महिला पदाधिकारी खारेगावर टोलनाक्यावर आल्या. या ठिकाणी त्यांच्याकडे टोल मागण्यात आला. पण टोलवर कुठलिही सुविधा नसल्याचं सांगत कपोते यांनी टोल देण्यास नकार दिला. यानंतर टोलवरील अधिकारी आणि कपोते यांच्या वाद झाला. या वादाचं पर्यावसन भांडणात झालं. या प्रकारानंतर किमान सातशे ते आठशे मनसे कार्यकर्ते खारेगाव टोल नाक्यावर जमा झाले. याच वेळी राज ठाकरे खारेगाव टोलनाक्यावरून नाशिकला निघाले होते. राज ठाकरे आल्याचं पाहून संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी खारेगाव टोलनाक्याची तोडफोड केली. यावेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनीही मनसैनिकांवर लाठीमार केला. लाठ्यांचा प्रसाद पोलिसांनी मनसैनिकांना चोप दिला.

Leave a Comment