चिन्यांची भूक भागविणार आफ्रिकेतील गाढवे

केथुवा – आफ्रिकेत प्रथमच केनिया येथे गाढवांचा कत्तलखाना सुरू केला गेला असून येथून चीनमध्ये गांढवांचे मांस पाठविले जाणार आहे असे समजते. चीनमध्ये गाढवाच्या मांसाला मोठी मागणी आहे आणि सध्या तेथे मांसाची चणचण जाणवते आहे. हा कत्तलखाना चीनची ही गरज पूर्ण करू शकेल असे मालकाचे म्हणणे आहे.

गेल्या कांही वर्षात केनियात गाढवे मारण्यासाठी कायदेशीर परवानगी दिली गेली आहे. मात्र गाढवे मारणारे कसाई अनेकवेळा गाढवांचे निरूपयोगी अवयव रस्त्यातच टाकून देतात त्यामुळे नागरिकांना त्रास होतो. कत्तलखान्यामुळे या त्रासातून मुक्तता होईल अशी नागरिकांची अपेक्षा आहे. मात्र पाणपुरवठा विभागात पाणी वाहून नेण्यासाठी गाढवांचा मोठा उपयोग होतो त्यामुळे पाणीपुरवठा विभागातील लोक कत्तलखान्याला विरोध करत आहेत. यामुळे गाढवांच्या चोर्‍या वाढतील अशी त्यांना भीती आहे.

चीनमधील नागरिकांच्या खाण्यापिण्याच्या सवयीत खूपच बदल झाला आहे. पैसा मिळण्याचे प्रमाण वाढल्याने शहराकडे स्थलांतर वाढले आहे. चीनी लोक दिवसांतून दोन वेळा मांसभक्षण करतात व त्यामुळे मांसाची चणचण निर्माण होते असे चीनमधील खाद्यविभाग अधिकार्‍याचे म्हणणे आहे. चीनी लोकांचे डेअरी उत्पादने हादडण्याचे प्रमाणही खूप वाढले आहे असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment