आप पार्टीची आरोपबाजी

महाराष्ट्रात काल आम आदमीने आपला पहिला दणका दिला आणि २२ हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा जावईशोध लावला. विजेच्या निर्मितीत आणि उत्पादनात एवढा भ्रष्टाचार झाला असल्याचे सिध्द करताना मात्र त्यांची एवढी दमछाक झाली की हा विजेचा झटका तो भ्रष्टाचार करणारे कथित आरोपी अजित पवार यांना न बसता खुद्द हे आरोप करणार्‍या आपच्या नेत्या अंजली दमानिया यांनाच बसला. त्यांच्या सांगण्यावरून महाराष्ट्रात हा एवढा भ्रष्टाचार झाला असल्याचे शेंबड्या पोरालासुध्दा पटले नसेल एवढे ते सांगणे निराधार आणि कच्च्या आधारावर होते. आम आदमी पार्टीबद्दल काही लोकांच्या मनात आकर्षण निर्माण झाले आहे ही गोष्ट नाकारता येत नाही. कारण सर्वसामान्य जनता भ्रष्टाचाराला विटली आहे आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात जो कोणी बेधडकपणे बोलतो त्याच्याविषयी या सामान्य माणसाला आकर्षण वाटायला लागते. मात्र अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालच्या आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी लोकांची ही नस ओळखून पक्ष चालवणे म्हणजे कोणावर तरी आरोपांचा भडीमार करणे अशीच कल्पना करून घेतली आहे.

अरविंद केजरीवाल दिल्लीत बसून अनिल अंबानी, भाजपा आणि कॉंग्रेस यांच्या साठगाठीबद्दल अतीशय संदिग्ध आरोप करत राहतात आणि त्याचीच आवृत्ती महाराष्ट्रात काढून अंजली दमानिया अजित पवारांच्या तथाकथित भ्रष्टाचारावर आपल्या चिरक्या आवाजात हल्लाबोल करत राहतात. राजकीय पक्ष काढणे आणि तो चालवणे यासाठी समाजाकरिता काही काम करावे लागते, समाजात मिसळावे लागते. शिक्षण, सहकार, उद्योग, साहित्य अशा विविध क्षेत्रात वावरून जनतेच्या संपर्कात रहावे लागते. याची या पक्षाच्या कार्यकर्त्यांना कसलीच कल्पना नाही. आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्रातल्या उमेदवारांवर नजर टाकली तर त्यातले एकदोन अपवाद वगळता सगळे उमदेवार जनतेपासून फटकून राहणारे असे दिसतात. विजय पांढरे हे भ्रष्टाचाराच्या विरोधात उभे राहिलेले होते. पण त्यांचे सामाजिक कार्य काय? आपण भ्रष्टाचारावर बोलून खळबळ उडवून दिली की आपल्याला भरमसाठ मते मिळतील असा या सगळ्या लोकांचा भ्रम आहे. म्हणून अंजली दमानिया यांनी काल निवडणुकीचा नारळ नेमका भ्रष्टाचाराचा आरोप करूनच फोडला. तिकडे अरविंद केजरीवाल आणि योगेंद्र यादव यांनी अंबानीच्या नावाने घोष सुरू केला आहे.

हे दोघे आम आदमी पार्टीचे वरिष्ठ नेते आहेत पण अंबानीच्या विरुध्द नेमके काय आणि कसे बोलायचे याबाबत या दोघांत एकवाक्यता नाही. म्हणजे दोन वरिष्ठ नेत्यातच एकवाक्यता नसेल तर खालच्या पातळीवरचे नेते एका तोंडाने कसे बोलतील आणि त्यांच्या बोलण्याचा, आरोप करण्याचा दर्जा हा सुमारच राहील. अंजली दमानिया यांनी याचे प्रत्यंतर आणून दिले. त्यांनी काल मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांन लक्ष्य केले. पवारांनी उर्जा खात्यामध्ये २२ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी केला. आता अजित पवार म्हणजे कोणी प्रभू रामचंद्राचा अवतार नव्हे ते भ्रष्ट असतीलही परंतु त्यांच्यावर २२ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचाराचा आरोप करण्यासाठी आरोप करणारी व्यक्ती मोठ्या आवाक्याची असायला हवी होती. पण अंजली दमानिया यांच्यात तो आवाका नाही हे त्यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत दाखवून दिले. २२ हजाराचा आकडा सांगताना त्या जेवढ्या ठामपणे बोलत होत्या तेवढा ठामपणा या भ्रष्टाचाराचा पुरावा देताना त्यांच्याकडे नव्हता. अंजली दमानिया आणि त्यांच्या पक्षाच्या अन्य एकदोन नेत्यांनी वीज मंडळाचे वाभाडे काढायचे ठरवले परंतु एवढ्या मोठ्या विषयाला हात घालताना जी तयारी करावी लागते ती त्यांनी केलेली नव्हती. हे आरोप केल्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तर देताना तर आम आदमी पार्टीच्या या बोलभांड नेत्यांना वीज मंडळाच्या कामकाजाची सामान्यसुध्दा माहिती नव्हती. हे पदोपदी दिसत होते.

भ्रष्टाचाराचा आरोप करताना ते हजार कोटींचे आकडे ते सहजपणे टाकत होते. परंतु निरनिराळ्या प्रकारच्या भ्रष्टाचाराची बेरीज तिथपर्यंत नेताना त्यांची दमछाक होत होती. आम आदमी पार्टी म्हणजे कसलेही पुरावे हातात न घेता वाटेल त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्याचा एककलमी कार्यक्रम राबवणारा पक्ष अशीच त्यांची प्रतिमा व्हायला लागली आहे. कोणत्याही राजकीय पक्षाचा भ्रष्टाचार निर्मुलन हा अजेंडा असावा लागतो. असलाच पाहिजे. परंतु तेवढ्या एका कार्यक्रमावर पक्ष मोठा होत नाही. दिल्लीमध्ये वेगळे वातावरण होते. निरनिराळ्या राज्यातले निरनिराळ्या प्रादेशिक संस्कृती मानणारे लोक दिल्लीत एकत्र आलेले आहेत. या शहराची सांस्कृतिक, साहित्यिक अशी एकसंघ ओळख नाही. त्यामुळे या शहरात अरविंद केजरीवाल यांचा एककलमी कार्यक्रम धकून गेला. महाराष्ट्रात अंजली दमानिया त्या कलमावर चालणार असतील तर आम आदमी पार्टीचा तमाशा झाल्याशिवाय राहणार नाही. अंजली दमानिया हे नाव टी.व्ही.वर येण्याच्या आधी कोणाला माहीतसुध्दा नव्हते. या पक्षाच्या अन्य उमेदवारांची परिस्थिती साधारण अशीच आहे.

Leave a Comment