जयललितांचे चातुर्य

राजीव गांधी यांची हत्या ही वाईटच. कोणीही तिची निंदाच करील पण तामिळनाडूत तशी ती केली जात नाही. ही हत्या करणारांविषयी तिथल्या बहुसंख्य जनतेला सहानुभूती वाटत असते. आता या मारेकर्‍यांपैकी तिघांची फाशी रद्द झाली आहे आणि तामिळनाडूतल्या या विचित्र वातावरणामुळे जयललिता यांनी या निर्णयाचा राजकीय फायदा घेण्याचे ठरवले आहे. जयललिता यांनी या मारेकर्‍यांना आता मुळात तुरुंगातूनच सोडून देण्यात यावे अशी मागणी केली आहे. या मागे राजकारण आहे. त्यांनी मोठ्या हुशारीने ही मागणी केली आहे पण त्यांना अशी मागणी करण्याचा अधिकार आहे का असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. यात कायद्याचे दोन मुद्दे आले आहेत. फौजदारी संहिता कायद्याची २३२ आणि २३५ ही दोन कलमे याबाबत आहेत. अशा कैद्याची सुटका करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे पण तो अनेक अटींनी बांधलेला आहे. हा अधिकार राज्य सरकारला ज्यांच्या बाबतीत वापरायचा असेल त्यांनी कोणता गुन्हा केला आहे हे महत्त्वाचे आहेच पण एका आरोपीला दोन वेळा माफीची सवलत मिळत नाही. या तीन आरोपींना सर्वोच्च न्यायालयाने फाशी रद्द करण्याची माफी दिली आहे आता दुसरी माफी मिळून त्यांना सुटका करून घेता येणार नाही. असे काही कायदे असले तरीही जयललिता यांची भूमिका वेगळी आहे. त्यांनी या आरोपींना सोडण्याची मागणी माफी या सदराखाली केलेली नसून त्यांची जन्मठेप संपली असल्यामुळे केली आहे.

आता जन्मठेप म्हणजे किती वर्षे कारावास हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला येईल. हे आरोपी २३ वर्षांपासून कैदेत आहेत. जन्मठेप म्हणजे १२ वर्षे की १४ वर्षे हा विषय सर्वोच्च न्यायालयासमोर आला असता न्यायालयाने असा निर्वाळा दिला आहे की, जन्मठेप म्हणजे १२ वर्षेही नाही आणि १४ ही नाही. जन्मभर तुरुंगवास म्हणजे जन्मठेप. तेव्हा जयललिता यांचा २३ वर्षांचा युक्तिवाद न्यायालयाला पटतो की नाही हा प्रश्‍न आहेच. अर्थात त्यांना या कशाशीही देणे घेणे नाही. हे आरोपी सुटले नाहीतरी त्यांना काही वाटणार नाही. त्यांना आपण या आरोपीसाठी काही तरी करीत आहोत हे दाखवून देण्यात केवळ रस आहे. कारण आता निवडणुका जवळ आल्या आहेत. तामिळनाडूत हा मोठ्या राजकारणाचा विषय झालेला असतो. राजीव गांधी यांची हत्या तामिळनाडूतल्या तामिळवादी लोकांनी केली. कोणाचीही हत्या वाईटच असते. हे खरे असले तरीही तामिळनाडूतल्या जनतेला किंवा नेमकेपणाने सांगायचे तर मतदारांना या मारेकर्‍यांविषयी सहानुभूती आहे. त्यामुळे यापूर्वी करुणानिधी यांच्या द्रमुक पक्षाने ही हत्या आणि तिच्यातले मारेकरी यांच्याविषयी कधीच कडक निषेधाची भूमिका घेतली नाही. कारण तशी कडक भूमिका घेतली तर तामिळनाडूतली जनता नाराज होते.

जनतेची हा प्रांतवादी, वंशवादी भावना हाच या राजकारणाचा आधार आहे. त्यावर नजर ठेवून आपले राजकीय पक्ष आपल्या भूमिका ठरवत असतात. १९९६ ते १९९८ या काळात केन्द्रात सत्तेवर असलेल्या तिसर्‍या आघाडीच्या सरकारला कॉंग्रेसने पाठींबा दिला होता पण या सरकारमध्ये राजीव गांधी यांच्या मारेकर्‍यांविषयी संदिग्ध भूमिका घेणारा आणि छुपी सहानुभूती बाळगणारा द्रमुक पक्ष सामील होता. या कारणावरून कॉंग्रेसने या सरकारचा पाठींबा काढून घेतला होता. राजीव गांधी यांची हत्या होऊन आता २३ वर्षे झाली. ती करणारे सात जण फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होण्याची वाट पहात आहेत. या सात जणांपैकी चौघांच्या फाशीची सजा अंमलात येण्याची वेळही आली होती पण त्यांना सोनिया गांधी यांच्यामुळे फाशीतून माफी मिळाली. या मारेकर्‍यांविषयी द्रमुकला सहानुभूती आहे म्हणून १९९७ साली केन्द्रातले सरकार पाडणार्‍या सोनिया गांधी यांना स्वत:लाच २०१० साली या मारेकर्‍यांविषयी सहानुभूती वाटायला लागली. या लोकांनी आपल्या पतीची हत्या केली असली तरीही त्यांना फाशी झालेली आपल्या मनाला सहन होणार नाही तेव्हा त्यांची फाशी माफ करावी अशी इच्छा त्यांंनी व्यक्त केली.

मग प्रियंका गांधी यांनी वेल्लोरच्या कारागृहात जाऊन या कैद्यांची भेट घेतली आणि निदान त्या चौघांची तरी फाशी टळली. फाशीची शिक्षा सौम्य करून त्यांना जन्मठेप सुनावण्यात आली. सोनिया गांधी यांना २०१० साली हा उमाळा का आला? त्या १९९७ साली या लोकांच्या विषयी एवढ्या कठोर का झाल्या होत्या? याचे साधे सोपे उत्तर म्हणजे २०१० साली तामिळनाडू विधानसभेची निवडणूक होणार होती. राजीव गांधी यांच्या मारेकर्‍यांना सहानुभूती दाखवली की तामिळ मतदार आपल्याकडे वळतात ही भावनाच या विसंगत वागण्यामागे होती. आता उर्वरित तीन आरोपींच्या फाशीचे असेच राजकारण सुरू आहे. आता या घटनेची राजकीय किंमत पुरेपूर वसूल करायला मुख्यमंत्री जयललिता पुढे सरसावल्या आहेत. या आधी त्या चार आरोपींना सहानुभूती दाखवणार्‍या कॉंग्रेसच्या नेत्यांनी आता नेमकी उलटी भूमिका घेतली आहे. सोनिया गांधी आता गप्प बसल्या आहेत आणि राहुल गांधी यांनी मात्र या तिघांना कठोर शिक्षा व्हायला हव्या होत्या असे म्हटले आहे. आता या वातावरणाचा फायदा आपल्याला होणार नाही हे त्यांना लक्षात आले आहे.

Leave a Comment