चिनी सैन्य वेगळ्याच अडचणीत

जगातील सर्वात मोठी सेना गणल्या जाणार्‍या चीनसमोर वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. गेल्या २० वर्षांच्या तुलनेत चीनी सैनिकांची उंची आणि जाडी वाढल्याने सध्या वापरात असलेली अनेक वाहने आणि हत्यारे त्यांच्यासाठी निरूपयोगी ठरत आहेत. परिणामी रडगाड्यासारख्या वाहनांत हे चिनी सैनिक मावेनासे झाले आहेत. अर्थातच त्यासाठी आता नवीन हत्यारे आणि नवीन वाहने यांची तातडीची गरज निर्माण झाली आहे.

पिपल्स लिबरेशन आर्मीच्या रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ जनरल आर्ममेंट विभागाने या संदर्भात केलेल्या सर्वेक्षणात ही बाब स्पष्ट झाली आहे. या सर्वेक्षणासाठी सर्व वयोगटातील २० हजार सैनिकांची तपासणी केली गेली. तेव्हा असे आढळले की गेल्या २० वर्षात चीनी सैनिकांची सरासरी उंची २ सेंमीने तर कमरेचा घेर सरासरी ५ सेंमी ने वाढला आहे. असे २३ लाख सैनिक सेनेत आहेत.

पूर्वीपासून वापरात असलेल्या बंदुकींचे दस्ते या सैनिकांसाठी फारच छोटे पडतात व परिणामी गोळ्या झाडताना निशाणा बरोबर लागत नाही. तसेच रणगाड्यांसारख्या वाहनांत या सैनिकांना कोंबून बसावे लागते व त्यामुळे तेथली त्यांची कामगिरीही चांगली होत नाही. हत्यारांची बनावट करताना सैनिकांची शारीरिक रचना आणि हत्यारे यांचा ताळमेळ बसावा लागतो. त्यावेळी त्यांचा हाताची ताकद, मांसपेशी यांचाही अभ्यास करावा लागतो. त्यामुळे ट्रीगर दाबयची त्यांची क्षमता लक्षात येत असते.

लष्करी संस्थेच्या सर्वेक्षणानुसार तोफखाना, इंजिनिअरिंग कॉर्प्स , केमिकल डिफेन्स कॉर्प्स या दलांतील सैनिकांसाठी नवीन हत्यारे आणि वाहने बनविणे तातडीचे आहे.