शिलाँग -पूर्वेचे स्कॉटलंड

भारताच्या पूर्वोत्तर राज्यामधील मेघालयची राजधानी असलेले शिलाँग हे ठिकाण देश विदेशातील पर्यटकांना पर्यटनाचा मनमुराद आनंद मिळवून देण्यासाठी प्रसिद्ध आहे. भारतीय संस्कृतीचे वेगळे दर्शन आणि भौगोलिक विविधता यांचे सुंदर दर्शन येथे घडते. बारमाही वाहणारे झरे, धबधबे, चोहोबाजूंना असलेली हिरवाई, दर्याा, डोंगर आणि नाना प्रकारच्या जातींचे महाकाय वृक्ष, या वृक्षांच्या फांद्या आणि मुळांपासून बनविले गेलेले सुंदर पूल अशी भरपेट मेजवानी पर्यटकांना भुरळ घालत असते.

मेघालय याचा अर्थच आहे मेघांचे निवासस्थान. या भागात पाऊस खूप पडतो. शिलाँगवर ब्रिटीश वास्तू आणि खाद्यपेयांचा दाट पगडा आहे. पाहण्यासारखी अनेक सुंदर ठिकाणे असलेले या राज्यात प्रामुख्याने आदिवासी जमातींची वस्ती आहे. हत्तीचा भास होणारा आणि तीन टप्प्यात पाणी कोसळणारा हाथी झरना हे येथल्या आकर्षणातले मुख्य आकर्षण म्हटले पाहिजे.

पाहाल तेथे निसर्गसौदर्याची रेलचेल असलेले शिलाँग नितांतसुंदर पण छोटेसे शहर आहे. येथून आठ किमीवर असलेला एलिफंटा फॉल पाहायलाच हवा. चेरापुंजी हे सर्वाधिक पावसाचे ठिकाण येथून ५६ किमीवर आहे. सततच्या पावसामुळे दाट झाडी आणि अतिविशाल वृक्षांची येथे दाटीच असून त्यातील कांही वृक्ष केवळ याच भागात आढळतात. या भागात या अतिविशाल वृक्षांची मुळे आणि फांद्या बांधून मोठमोठे पूल तयार केले गेले असून ते अतिशय मजबूत आहेत. एकावेळी ५० लोक या पुलांवरून सहज जाऊ शकतात.

डॉन बास्को सेंटर हे सांस्कृतिक संग्रहालय, शिलाँग पीक हा १९६६ मीटर उंचीचा भाग, घोड्याच्या नालाचा आकार असलेले मानवनिर्मित वार्डस सरोवर, बोटॅनिकल गार्डन, स्प्रेड इगल फॉल हा रूंद धबधबा आणि अ्रनोखे व प्रेक्षणीय असे बटरफ्लाय संग्रहालय ही येथील आणखी काही आकर्षणे. हे संग्रहालय फुलपाखरांना समर्पित आहे.

शिलाँगला जाण्यासाठी गुवाहाटीपासून विमान, बस, टॅक्सी अशा सेवा उपलब्ध आहेत. मार्च- एप्रिल आणि आक्टोबर नोव्हेंबर हा काळ येथे भेट देण्यासाठी चांगला काळ आहे.

Leave a Comment