बारावीच्या परीक्षेस उद़यापासून सुरूवात

मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणा-या बारावीच्या लेखी परीक्षेला २० फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या शिक्षण विभागाच्या नऊ विभागीय मंडळांकडून ही परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेची सर्व तयारी पुर्ण झाली असल्याखची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे.

आगामी काळात होत असलेल्या या बारवीच्या परीक्षेस राज्यातील ७ हजार ५०१ कनिष्ठ महाविद्यालयांतून या परीक्षेला पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार ११ लाख ९९ हजार ५३१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, तर जुन्या अभ्यासक्रमानुसार (जुने विद्यार्थी) १ लाख ३७ हजार ५८३ असे एकूण १३ लाख ३७ हजार ११४ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. यात ७ लाख ५९ हजार ८०९ विद्यार्थी तर ५ लाख ७७ हजार ३०५ विद्यार्थिनींचा समावेश आहे.यामध्येा मुंबई विभागातून ३ लाख २८ हजार ६९८ तर कोकण विभागातून ३३ हजार ७६८ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. ही परीक्षा नवीन विद्यार्थ्यांसाठी २०७७ तर जुन्या विद्यार्थ्यांसाठी ६८५ परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी दिली.

ही परीक्षा २७ मार्चपर्यंत चालणार आहे. जुन्या अभ्यासक्रमांची परीक्षा ६०० गुणांची तर पुनर्रचित अभ्यासक्रमांनुसार ही परीक्षा ६५० गुणांची राहील. ‘पर्यावरण शिक्षण’ हा विषय कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कला, विज्ञान, वाणिज्य आणि एमसीव्हीसी व बायोफोकल या शाखांना अनिवार्य केला असून त्यासाठी ५० पैकी मिळालेले गुण विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत देण्यात येतील.

आागमी काळात बारावीच्या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी मंडळाकडून प्रत्येक जिल्ह्यात ७ प्रमाणे एकूण २४५ भरारी पथके नेमली आहेत. तर प्रत्येक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्या, विशेष महिला पथके, विशेष भरारी पथके नेमली आहेत. तर प्रत्येक विभागीय मंडळात विभागनिहाय हेल्पलाइन दूरध्वनी क्रमांक देण्यात आले आहेत.

Leave a Comment