राष्ट्रपती पुतीन आणि एलिना विवाहाच्या जोरदार अफवा

मास्को – रशियाचे राष्ट्रपती ब्लीदीमिर पुतीन आणि गोल्ड मेडल विजेती जिमनॅस्ट एलिना काब्येवा यांच्या विवाहाच्या जोरदार अफवा रशियात पसरल्या असून रशियन सरकारने मात्र त्याचा इन्कार केला आहे. ३० वर्षीय एलिना आणि ६१ वर्षीय पुतीन यांचे अफेअर सुरू असल्याची चर्चा दीर्घकाळ सुरू असून एका वृत्तपत्राने तर यापूर्वीच त्यांचा विवाह झाला असून त्यांना दोन अपत्ये असल्याची खबरही छापली होती. त्यानंतर हे वृत्तपत्र बंद करण्याची पाळी मालकांवर आली होती. पुतीन यांना पत्नीपासून अलिकडेच कायदेशीर घटस्फोट घेतला आहे.

एलिना मिजमेकामस्का शहरात लहान मुलांच्या क्रिडा स्पर्धासाठी आली असताना तिने आपल्या हातातील वेडिंग रिंग दूरदर्शन कार्यक्रमात दाखविल्यानंतर विवाहाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. गेल्या आठवड्यात इजिप्तच्या संरक्षण मंत्र्यांसोबतच्या पुतीन यांच्या  मुलाखती दरम्यानही क्रेमलीन फ्रेंडली न्यूज एजन्सीने पुतीन यांच्या हातातील वेडिंग रिंगचे फोटो प्रसिद्ध केले होते.

पुतीन सध्या सोची ऑलींपिक गेम्सच्या आयोजनात गुंतले आहेत. सोची गेम्स शुभारंभात ऑलिंपिक मशाल घेतलेल्या सहा खास अॅथलेट मध्ये एलिनाचाही समावेश होता.