गोंदिया- महाराष्ट्रातील गडचिरोलीत बेतकथी गावाजवळील जंगलात पोलिसांना सात नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. या चकमकीत पाच पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत. गडचिरोलीमधील आतापर्यंतचे नक्षलवाद्यांविरोधातले पोलिसांची मोठी कारवाई आहे. या चकमकीत ठार झालेल्या सात नक्षलवाद्यांमध्ये दोन महिला आणि पाच पुरूष नक्षलवाद्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यात देवरी दलामचा प्रमुख लालसू या हल्ल्यात ठार झाला आहे.
यावेळी झालेल्या चकमकीनंतर पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठाही जप्त केला आहे. गडचिरोलीमधील एका ग्रामपंचायतीला जाळल्याीनंतर हे नक्षलवादी पळून जात होते. यावेळी जंगलात पोलीसांनी त्यांळचा पाठलाग केला. त्यानवेळी पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये जोराची चकमक झाली. तब्बल तासभर सुरू असलेल्या या चकमकीत सात नक्षलवादी ठार झाले आणि पाच पोलीस अधिकारी जखमी झाले. अशी माहिती स्थानिक पोलीस अधिका-यांनी यावेळी दिली.
या चकमकीत नक्षलवादी म्होरक्या लालसू, उत्तर गोंदिया-गडचिरोली विभागाचा नक्षलीप्रमुख उमेश तसेच नवीन आणि वीरू अशी ठार झालेल्या नक्षलवाद्यांची नावे असून त्यात प्लाटूनची सेक्शन कमांडर महिला- शामको आणि रूनबाई या महिला नक्षलवाद्यांचाही मयतामध्ये समावेश आहे. यापूर्वी आठ फेब्रुवारीला गडचिरोली जिल्ह्यातील आहेरी तालुक्यातील दामरंचा गावाजवळील छत्तीसगड सीमारेषेवर पोलिस आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले होते.