.jpg)
महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राज ठाकरे यांचे टोल नाक्याच्या विरोधातले आंदोलन फार गंभीरतेने घेतले आहे आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी टोल नाक्यांवर केलेल्या नुकसानीची भरपाई त्यांच्याकडून करून घेतली जाईल असे जाहीर केले आहे. जर ही भरपाई कार्यकर्त्यांनी केली नाही तर राज ठाकरे यांची मालमत्ता जप्त करू आणि त्यातून ही भरपाई करून घेऊ, असेही त्यांनी म्हटले आहे. खरे म्हणजे ही भरपाई घ्यायची की नाही आणि घेतली तर ती कशी घ्यायची, याचा निर्णय काही गृहमंत्री करणार नाहीत. तो न्यायालयाने करायचा असतो. पण आर.आर. पाटील वावदुकपणे बोलण्यात फार पटाईत आहेत. त्यामुळे अडचणीत येऊन त्यांनी आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवले होते. परंतु टोल नाक्यांवर निर्बंध आणण्याची भाषा सुरू होताच त्यांनी पुन्हा एकदा राणा भिमदेवी थाटाच्या वल्गना सुरू केल्या असून टोल नाक्यावरील हुल्लडबाजीच्या संदर्भात कडक कारवाई केली जाईल असा निर्धार व्यक्त केला आहे. आजवर राज्यात काही कमी गुंडगिरी झालेली नाही. तिच्यातली बरीच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच केली आहे. पण आजवर आबांनी कधीही अशा गुंडगिरीच्या विरोधात अशी कडक कारवाई केलेली नाही.
आता तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोल नाक्यांवर केलेल्या धिंगाण्याची आणि नासधुशीची भरपाई राज ठाकरे यांची मालमत्ता जप्त करून केली जाईल असे आबांनी म्हटले आहे. खरे तर अशी कडक कारवाई करण्याची राष्ट्रवादीची रीत नाही. तशी असती तर आबांनी सुप्रिया सुळे यांनाही असा इशारा द्यायला हवा होता. कारण सुप्रिया तार्ईंनी तर लोकांना मंत्र्यांच्या गाड्या पेटवण्याचा सल्ला दिला होता. दरम्यानच्या काळात त्यांचा हा सल्ला कोणीही मानला नाही. पण मानला असता तर आणि लोकांनी आपला राग प्रकट करण्यासाठी मंत्र्यांच्या गाड्या जाळल्या असत्या तर आबांनी काय केले असते. किंबहुना असे भडकावू भाषण केल्याबद्दल त्यांना साधी समजही दिलेली नाही. त्यांच्या भाषणाची मूळ प्रतही मागवली नाही. आता टोल नाक्यावरच्या नुकसानीसाठी राज ठाकरे यांची मालमत्ता जप्त करण्याचा इशारा देणार्या आबांना राज ठाकरे येत्या एक दोन दिवसांत काही तरी सॉलीड प्रत्युत्तर देणार हे नक्की आहे. पण आबांनी हा इशारा राज ठाकरे यांना दिलेला नाही हे आपण समजून घेतले पाहिजे. राज ठाकरे यांनी नाक्यांवर केलेल्या आंंदोलनात काही नुकसान झाले असले तरीही त्यांचे हे आंदोलन मनसेने केले असले तरी या आंदोलनाचा बोलवता धनी मुख्यमंत्री आहेत.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या राजकारणातले प्यादे म्हणून राज ठाकरे यांना वापरले आहे आणि त्यांच्या राजकारणाची सोय म्हणून मनसेने हे आंदोलन केले आहे. सुरूवातीला कोल्हापुरात टोलच्या विरोधातला आंदोलन केले होते आणि ते फारच तीव्र होते. कोल्हापुरातला टोल रद्द व्हावा म्हणून हे आंदोलन होते आणि आंदोेलकांची मागणी योग्य होती. त्याला प्रतिसाद म्हणून काही मागण्या मान्य केल्या तर त्याचे श्रेय शिवसेनेला मिळेल अशी भीती मुख्यमंत्र्यांना वाटायला लागली म्हणून त्यांनी मनसेला या आंदोलनात उतरवले. मनसेने हे आंदोलन राज्यभर केल्याचा दावा केला. तो कितपत खरा हा मुद्दा वेगळा पण ते आंदोलन मनसेने केले म्हणून आपण टोलचा प्रश्न सोडवायला निघालो आहोत असे दाखवत मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांना चर्चेसाठी पाचारण केले. मुख्यमंत्र्यांनी ५० आमदार असलेल्या शिवसेनेच्या आंदोलनाला प्रतिसाद ने देता ११ आमदारांच्या पक्षाच्या छटाकभर आंदोलनाला प्रतिसाद देत त्याला चर्चेसाठी पाचारण केले यातच सारे राजकारण आले. आता गंमतीचा भाग पुढेच आहे. या आंदोलनानंतर मुख्यमंत्री राज ठाकरे यांची प्रतिष्ठा वाढवण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि आर. आर. पाटील मात्र त्यांची मालमत्त्ाा जप्त करण्याची धमकी देत आहेत. सत्ताधारी पक्षातल्या दोन घटक पक्षांचे एकाच विषयात असे परस्पर परस्पर विरोधी धोरण आहे. या दोन पक्षांचे आपसात पटत नाही आणि ते एकत्र असले तरीही सतत भांडत असतात. पण त्यांच्यातले मतभेद असे अनेक विषयांत सातत्याने प्रकट होत असतात.
आता आबा राज ठाकरे यांची मालमत्ता जप्त करणार आणि त्याच वेळी राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर काजूंचा आणि सुक्या मेव्याचा आस्वाद घेत टोलच्या प्रश्नावर चर्चा करीत बसलेले असणार. आबांच्या इशार्यातली खरी गोम आता लक्षात यायला काही हरकत नाही. आबांनी लेकी बोले सुने लागे या न्यायाने हा इशारा मुख्यमंत्र्यांनाच दिला आहे कारण राज ठाकरे यांना आंदोलन करायला मुख्यमंत्रीच प्रोत्साहन देत आहेत. प्रोत्साहन मुख्यमंत्र्यांनी दिले असले तरीही राज ठाकरे मोठे झाल्याने शिवसेनेची मते आकृष्ट करणार आहेत आणि त्याचा फायदा राष्ट्रवादी कॉंगे्रेसलाही होणारच आहे मग आबांनी राज ठाकरे यांना एवढे सुळावर चढवायचे कारण काय ? असा प्रश्न पडतो. आबांनीही राज ठाकरे यांना प्रोत्साहनच दिले पाहिजे. पण मेख इथेच आहे. मुख्यमंत्री टोल आणि राज ठाकरे यांचा खेळ करताना राष्ट्रवादीला विश्वासात घेत नाहीत. आराराबांना खरे दु:ख याचे वाटत आहे. या प्रश्नाचे सारे श्रेय बाबाच घेऊ पहात आहेत. म्हणून आबा बाबांवर चिडले आहेत. राज ठाकरे यांची मालमत्ता जप्त करण्याचा त्यांचा त्रागा राज ठाकरे यांच्यासाठी नसून बाबांसाठी आहे. राजकारणाचे सारेच पदर सगळ्यांनाच कळतात असे नाही पण कोणी काहीतरी आगळे वेगळे करायला लागला की, त्यात राजकारण आहे असे खुशाल समजावे.