मुंबई- पोलिस दलाच्या पटलावरील मोहरे सरकविण्यासाठी राजकीय फायद्या-तोट्याचा विचार झाल्याचा आरोप झाल्यानंतर गृहमंत्री आर आर पाटील यांनी जाती-पातीने नव्हे तर गुणवत्तेच्या निकषांवर पदोन्नती व नियुक्त्या झाल्या असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही यात कोणतेही गडबड झाली नसल्याचे सांगत एस्टॉब्लिशमेंट बोर्डाने आखून दिलेल्या चौकटीत व नियमानुसार नियुक्त्या केल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
दरम्यान, आपण नाराज असलेल्या विजय कांबळे आणि जावेद अहमद यांच्यासह वरिष्ठ अधिका-यांची भेट घेऊन वस्तुस्थिती सांगून त्यांची नाराजी दूर करू, असे आर आर पाटील यांनी म्हटले आहे. सेवाज्येष्ठता नाकारून एटीएसचे प्रमुख राकेश मारिया या ज्युनियर पोलिस अधिका-याला मुंबई पोलिस आयुक्तपद मिळाल्याने ज्येष्ठ अधिकारी विजय कांबळे, जावेद अहमद नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. तसेच ते या नियुक्तीविरोधात बंड करणार असल्याचे कळते. कांबळे, जावेद हे दोघे डावलल्याने राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.
याचबरोबर विजय कांबळे आरपीआयचे नेते रामदास आठवले यांच्या संपर्कात असून, ते राजीनामा देऊन राजकारणाची पायरी चढणार असल्याचे आरपीआयच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. सेवाज्येष्ठता व गुणवत्ता असून केवळ चालत नाही तर त्यासाठी मंत्र्यांच्या दालनातील आतल्या केबिनपर्यंत पोच असावी लागते हे आता पोलिस दलातील अधिका-यांना कळून चुकले आहे. त्यामुळे हे नाराज पोलिस अधिकारी काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व गृहमंत्री आर आर पाटील मात्र गुणवत्तेनुसार व नियमानुसार झाल्याचे सांगत आहेत. मात्र याला राजकीय व जाती-पातीचा रंग दिला जात असल्याचे स्पष्ट होत आहे. भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी मराठमोळ्या विजय कांबळेंना का डावलले गेले असा प्रश्न विचारत काँग्रेस-राष्ट्रवादीवर काल बीड येथे टीका केली होती.