मुंबई – काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची मुंबईत १ मार्च रोजी होणारी सभा राज्यातील कॉग्रेंस नेत्यांसाठी प्रतिष्ठेचा मुद्दा बनली आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील सभेला जितकी गर्दी होती त्यापेक्षा अधिक गर्दी राहुल यांच्या सभेसाठी जमली पाहिजे असा आदेश आल्याने राज्यातील सर्व नेते झडझडून कामाला लागले असल्याचे समजते.
या संदर्भात महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी मोहन प्रकाश, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे खासदार आणि मंत्री यांची मुंबईत नुकतीच बैठक पार पडली असून त्यात वरीष्ठ नेत्यांची या सभेबाबतची मते विचारात घेण्यात आली आहेत. त्यांनुसार राहुल यांच्या सभेला मोदींच्या सभेपेक्षा अधिक गर्दी जमवता आली तरच राज्यात काँग्रेसचा प्रभाव पडू शकेल असे मत अनेक वरीष्ठ नेत्यांनी व्यक्त केले आहे. मोदींच्या सभेशी राहुल यांच्या सभेची तुलना अपरिहार्य आहे व त्यामुळेच पक्षाला राज्यातील आपली ताकद दाखवावीच लागेल असेही मत व्यक्त केले गेले आहे.
राज्यात काँग्रेसचे अनेक आमदार नाराज आहेत. त्यांची नाराजी पक्षाला निवडुकीत भारी पडू शकते असेही सांगितले जात आहे. मुख्यमंत्री चव्हाण यांनी यावेळी राज्यातील प्रलंबित राहिलेले अनेक महत्त्वाचे निर्णय लवकरात लवकर घेण्याचे आश्वासन प्रभारींना दिले आहे तसेच खासदारांनी आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेशही प्रभारींनी दिले आहेत असे समजते.