मॅकलमने झुंजार शतक झळकवत न्यूझीलंडचा डावाने पराभव टाळला

वेलिंग्टन – शंभरीच्या आत निम्मा संघ तंबूत परतूनही, कर्णधार ब्रॅन्डन मॅकलमने झुंजार शतक झळकवत न्यूझीलंडचा डावाने पराभव टाळला. या खेळीत त्याला बी.वॉटलिंगनेही तितकीच तोलामोलाची साथ दिली. मॅकलम (११४) तर, वॉटलिंग (५२) धावांवर नाबाद आहे. भारताकडे २४६ धावांची आघाडी होती. तिस-या दिवसअखेर न्यूझीलंडच्या पाचबाद २५२ धावा झाल्या आहेत. न्यूझीलंडकडे सहा धावांची आघाडी आहे. सकाळच्या सत्रात प्रभावी गोलंदाजी करुन, न्यूझीलंडच्या चार फलंदाजांना शंभरीच्या आत तंबूत धाडणारे भारतीय गोलंदाज मात्र नंतर निष्प्रभ ठरले.

मॅकलम आणि वॉटलिंगने सावध आणि संयमाने फलंदाजी करत न्यूझीलंडवरील डावाने पराभवाचे संकट टाळले. मॅकलम आणि वॉटलिंगची जमलेली जोडी उद्या लवकर फोडली नाही तर, सहज वाटणारा विजय कठिण होऊ शकतो किंवा सामनाही न्यूझीलंडच्या बाजूने झुकू शकतो. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना उद्या न्यूझीलंडचा डावा झटपट गुंडाळावा लागेल. न्यूझीलंडच्या आघाडीच्या फलंदाजांना बाद केल्यानंतर भारत रविवारीच डावाने विजय मिळवेल अशी आशा निर्माण झाली होती. मात्र मॅकलम आणि वॉटलिंग जोडीने भारतीय गोलंदाजीची हवा काढून घेतली. रविवारी झहीर खान सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने तीन गडी बाद केले . मोहोम्मद शामी आणि रविंद्र जाडेजाने प्रत्येकी एक गडी बाद केला.

Leave a Comment