पुणे- काही दिवसापूर्वीच केलेल्या राज्यातील ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांच्या बहिष्कार आंदोलनापाठोपाठ आता मुख्याध्यापकांनीही एल्गार पुकारला आहे. त्याेमुळे आगामी काळात बोर्डाच्या परीक्षांमागचे शुक्लकाष्ठ केंव्हाा संपणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. राज्य सरकारने आगामी काळात राज्यातील मुख्याध्यापकांच्या मागण्यांबाबत तातडीने पावले न उचलल्यास, दहावीच्या उत्तरपत्रिकांच्या गठ्ठ्यांची कोणतीही जबाबदारी न घेण्याचा इशारा राज्यातील मुख्याध्यापक संघटनांनी दिला आहे. त्यामुळे आता नवीन पेच निर्माण झाला आहे.
औरंगाबाद येथे राज्यभरातील मुख्याध्यापक संघटनांची बैठक पार पडली. या बैठकीत मुखध्यापकांनी आता असहकाराच्या भूमिकेवर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राप्रमाणे राज्यामध्येही सहाव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी संघटनांकडून लावून धरण्यात आली होती. मुख्याध्यापक संघटनांनी केलेल्या आंदोलनांनंतर वेतन वगळता इतर भत्ते व फायदे केंद्राच्या नियमांप्रमाणे देण्याची सुरुवात राज्य सरकारने केली होती. मात्र, त्याचप्रकारे वेतन देण्याचा मुद्दा राज्य सरकारने सातत्याने टाळला. त्यामुळेच आता मुख्याध्यापक दहावीच्या विद्यार्थ्यांचे उत्तरपत्रिकांचे गठ्ठे स्वीकारण्याची जबाबदारीच घेणार नाहीत.
बोर्डाच्या परीक्षा झाल्यानंतरच्या टप्प्यात हे असहकार आंदोलन होणार असल्याने, त्यामुळे विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही याची काळजी मुख्याध्यापकांनी घेतली आहे. राज्याचे शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनाही संघटनांचे निवेदन दिले आहे. आता यावर काय तोडगा काढला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.