माढ्याचा गुंता वाढला

सोलापूर जिल्ह्यातला माढा मतदारसंघ हा महायुतीतल्या पाच पक्षांमध्ये वादाचा मुद्दा होऊन बसला आहे. अजून तरी या महायुतीने जागा वाटपाची चर्चा सुरू केलेली नाही, पण ती सुरू होण्याच्या आतच केवळ एका मतदारसंघावरून वाद सुरू झाला आहे. हा मतदारसंघ केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचा आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या मतदारसंघात अकलूज, माळशिरस, माढा, सांगोला हे सोलापूर जिल्ह्यातले राष्ट्रवादीचे प्राबल्य असलेले भाग समाविष्ट होतात. त्याशिवाय सातारा जिल्ह्यातले तीन मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात समाविष्ट करण्यात आलेले आहेत. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे वर्चस्व असून तरी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील हे राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून उभे राहणार आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत मोहिते-पाटील पंढरपूर विधानसभा मतदारसंघात ४५ हजार मतांनी पराभूत झाले होते. त्या काळात त्यांना आपला परंपरागत मतदारसंघ सोडून पंढरपुरात उभे रहावे लागले आणि पराभव पत्करावा लागला. त्यांच्याविषयी प्रचंड नाराजी आहे असा महायुतीतल्या नेत्यांचा समज आहे. शिवाय विजयसिंह मोहिते पाटलांचे बंधू प्रतापसिंह मोहिते-पाटील हे याच मतदारसंघात अपक्ष म्हणून उभे राहणार आहेत.

या दोघातल्या मतविभागणीमुळे इथे आपल्याला विजय मिळेल असा विश्‍वास युतीतल्या घटक पक्षातल्या नेत्यांना वाटत आहे. म्हणून त्यांची माढ्यात उमेदवारी मिळविण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे आणि हा वाद चव्हाट्यावर आला आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते महादेव जानकर यांच्यामुळे हा वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यांनी बीडच्या महायुतीच्या एल्गार सभेत बोलताना महायुतीत हा मतदारसंघ आपल्यालाच मिळेल असा विश्‍वास व्यक्त केला. या मतदारसंघावरून कसलाही संघर्ष नाही असे युतीचे नेते म्हणत असले तरी प्रत्यक्षात तो असल्याचे स्पष्ट झाले आहे. पूर्वी या जागेवरून महायुतीतल्या राष्ट्रीय समाज पार्टी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना या दोन पक्षात द्वंद्व पेटले होते. या उमेदवारीवरून निर्माण झालेला महायुतीतला हा सरळ सामना कसा सोडवावा याची विवंचना युतीच्या नेत्यांना पडली होती. तशी ती असतानाच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनीही आपली टोपी या कुस्तीच्या मैदानात टाकली आहे आणि या सरळ सामन्याचे रूपांतर तिरंगी सामन्यात म्हणजे तिढ्यात करून टाकले आहे.

त्यामुळे हा सामना म्हणजे उमेदवारीचा सामना अधिकच रंगतदार झाला आहे. तसे पाहिल्यास या तिघांनीही या जागेवर आपला हक्क सांगताना जे युक्तिवाद केले आहेत. ते पाहिले म्हणजे तिघांचाही दावा योग्यच वाटतो इतके ते दावे सुसंगत आहेत आणि म्हणूनच मुंडे आणि उध्दव ठाकरे यांच्यासाठी हा वाद सोडवणे कठीण होऊन बसणार आहे. राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते महादेव जानकर यांनी या मतदारसंघात २००९ साली श्री. शरद पवार यांच्या विरोधात लढत दिलेली होती. ते तिसर्‍या क्रमांकावर राहिले परंतु त्यांची मते दखल घ्यावी एवढी होती. किमानपक्षी त्यांचा दावा समर्थनीय वाटावा एवढी तरी त्यांची मते होती. महादेव जानकर याच मतदार संघातले राहणारे आहेत आणि त्यांची काही ठराविक मते या मतदारसंघात आहेत. या जागेवर दुसरा दावा सांगणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते श्री. सदुभाऊ खोत यांच्यासाठी तो दावा सांगत आहेत. त्या दाव्याच्या समर्थनार्थ त्यांच्याकडे जुने रेकॉर्ड उपलब्ध नाही. कारण स्वाभिमानीने ही जागा कधी लढवलेली नाही. मात्र गेल्या वर्षभरामध्ये सोलापूर जिल्ह्यात उसाच्या दराच्या मागणीसाठी जे आंदोलन झाले त्या आंदोलनात खोत त्यांनी हा जिल्हा पिंजून काढला. विशेषतः माढा मतदारसंघाशी निगडित असलेल्या गावांमध्ये त्यांनी जंगी सभा घेतल्या.

राजू शेट्टी यांना त्यांच्या हातकणंगले मतदारसंघात उसाच्या आंदोलनाच्या जोरावर जसे यश मिळाले तसेच सदुभाऊ खोत यांना माढा मतदारसंघात यश मिळेल अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची अटकळ आहे. परंतु सदुभाऊ खोत यांचा हा प्रभाव सोलापूर जिल्ह्यापुरताच मर्यादित आहे आणि या मतदार संघाला जोडलेल्या सातारा जिल्ह्यातल्या ३ तालुक्यात त्यांचा प्रभाव नाही. त्यामुळे त्यांच्या दाव्यामध्ये तसा काही दम नाही. महादेव जानकर यांचा पक्ष म्हणजे एक खांबी तंबू आहे. त्यांच्या पक्षाचे ते एकमेव उमेदवार आहेत आणि त्यांचा प्रभाव फक्त याच मतदारसंघात आहे. मात्र त्यांच्या पक्षाच्या बांधील मतदारांचा युतीला अन्य मतदारसंघात फायदा व्हावा म्हणून युतीने त्यांना जवळ केलेले आहे. त्यामुळे ते माढा मतदारसंघ मागतात यात चूक काही नाही. या दोघांचा हा संघर्ष जारी असतानाच रामदास आठवले यांनीसुध्दा या मतदारसंघावर दावा करून हा संघर्ष अधिक तीव्र केला आहे. आपण या मतदारसंघातून पूर्वी निवडून आलो होतो असा त्यांचा दावा आहे. पण हा दावा काही खरा नाही. ते या मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आले होते आणि तेही पंढरपूर मतदारसंघातून आले होते. आता मतदारसंघ बदलला आहे. तेव्हा त्यांचा दावा सपशेल, असमर्थनीय आणि केवळ संघर्ष वाढवण्यासाठी केला आहे. गंमतीचा भाग म्हणजे या मतदारसंघात मागच्यावेळी भाजपाचे सुभाष देशमुख उभे होते आणि त्यांना दोन नंबरची मते होती. यावेळेस त्यांना कोणी विचारलेले नाही. त्यामुळे तेही नाराज आहेत.