केजरीवाल यांचे पलायन

अरविंद केजरीवाल यांनी कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर दिल्लीत सरकार स्थापन केले तेव्हाच त्यांची काही गणिते ठरलेली होती. ज्या कॉंग्रेसच्या विरोधात आपण लढत आहोत त्यांच्याशी सहकार्य करून सरकार स्थापन करणे ही विचित्र गोष्ट होती आणि ती विचित्र आहे हे केजरीवालांना कळतही होते. परंतु हे सरकार आपला पाठिंबा काढून घेईल आणि त्यांनी तो काढून घेतला की आपण भ्रष्टाचाराच्या लढ्यात आपण हुतात्मा ठरलो आहोत असे दृश्य निर्माण करून आपण राजीनामा देऊ आणि त्या हौतात्म्याच्या जोरावर आपण लोकसभेच्या निवडणुकीत थेट पंतप्रधानपदाला भिडू असे त्यांचे गणित होते. त्यांनी शीला दीक्षित यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी जाहीर केली. तेव्हाच कॉंग्रेसचा पाठिंबा काढून घेतला जाईल असे वाटत होते. पण कॉंग्रेसने त्यांना भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून हुतात्मा करायचे नाही असे ठरवले होते. त्यामुळे शीला दीक्षित यांची चौकशी जाहीर करताच कॉंग्रेसचा पाठिंबा काढला जाईल ही अपेक्षा फोल ठरली. कॉंग्रेसवाले त्यांना हुतात्मा होऊ देत नाही आणि इकडे लोकसभेची तर घाई जोरात सुरू झालेली. त्यामुळे केजरीवाल यांना हुतात्मा होण्याची घाई झाली आणि त्या घाईघाईत एका चुकीच्या मुद्यावर राजीनामा दिला. आता त्यांच्या त्या राजीनाम्यामुळे त्यांच्याविषयी आदर वाढतो की त्यांची लोकांना दया येते याची चर्चा सुरू झालेली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून ४९ दिवस काम करून अरविंद केजरीवाल यांनी आपली प्रतिमा सुधारली की बिघडवली यावर आता त्यांनाच विचार करावा लागत आहे. अलीकडच्या काही दिवसांमध्ये देशातले काही निवृत्त सनदी अधिकारी केजरीवाल यांच्या आप पार्टीकडे वळायला लागले होते. देशातला भ्रष्टाचार हाच पक्ष कमी करेल असा विश्‍वास त्यांना वाटत होता. पण आता ४९ दिवसांच्या कार्यकाळात केजरीवाल यांनी ज्या पध्दतीने कारभार केला आहे ती पध्दती पाहिल्यानंतर या सगळ्या निवृत्त अधिकार्‍यांना आम आदमी पार्टीत यावेसे वाटेल असे काही दिसत नाही. कारण केजरीवाल यांनी या काळात आपण सरकार चालवू शकत नाही हे पूरेपूर सिध्द केले आहे. त्यांना सत्ता मिळाली पण चालवता आली नाही. सवंग घोषणा करणे आणि त्यांच्या माध्यमातून आपली प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हीच त्यांची कार्यशैली राहिली. त्यांचे काही निर्णय जनतेच्या हिताचे होते. परंतु ते घेण्यामागे जनतेच्या हितापेक्षा आपली प्रतिमा निर्माण करणे आणि तिच्या मदतीने लोकसभेत अधिक जागा मिळवण्यासाठी झेप घेणे हेच त्यांचे उद्दिष्ट होते. म्हणूनच जनलोकपाल विधेयक मांडताना सुध्दा त्या विधेयकापेक्षाही त्यांनी आपल्या प्रतिमेला प्राधान्य दिले.

मुळात हातात बहुमत नाही, जनतेचा स्पष्ट कौल नाही तरीही त्यांनी हे क्रांतीकारक विधेयक मांडण्याचा अट्टाहास केला. त्यातही पुन्हा हे विधेयक बेकायदारित्या मांडणार असा हट्ट केला. या गोष्टी करतानासुध्दा आपले बहुमत ज्यांच्यामुळे सिध्द झाले आहे त्या कॉंग्रेसच्या आमदारांना विश्‍वासात घेण्याऐवजी त्यांच्याशीच संघर्ष मांडला. एवढे करूनही त्यांचे हे बेकायदा विधेयक मंजूर झालेच पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. अर्थात, भाजपा आणि कॉंग्रेसच्या आमदारांनी मिळून त्यांचा हा घटनाबाह्य प्रयत्न हाणून पाडला. त्यामुळे केजरीवाल यांनी राजीनामा देऊन टाकला. आता या प्रयत्नातून ते लोेकांच्या मनावर, आपण भ्रष्टाचाराच्या मुक्तीसाठी मुख्यमंत्रीपद सोडले हे ठसवण्याचा व्यर्थ प्रयत्न करत आहेत. आपण भ्रष्टाचार निर्मुलन करण्यासाठी जनलोकपाल विधेयक मांडले पण भाजपा आणि कॉंग्रेसच्या भ्रष्ट नेत्यांनी त्या विधेयकाला विरोध केला. याचा अर्थ आपण भ्रष्टाचारविरोधी आहोत आणि भाजपा, कॉंग्रेस हे भ्रष्टाचाराचे समर्थक आहेत असा त्यांचा दावा आहे. पण हा दावा करताना आपण जनलोकपाल विधेयक बेकायदारित्या मांडत होतो हे ते सांगतच नाहीत. अशाप्रकारे हे विधेयक मांडण्याची आत्ताच का घाई होती याचा खुलासा त्यांनी कधीच केला नाही.

अशा प्रकारचे एक विधेयक नव्हते म्हणून भ्रष्टाचाराची चौकशी थांबली होती का? तर तसेही काही दिसत नाही. केजरीवाल यांनी शीख विरोधी दंगलीतील दोषींची चौकशी करण्याचा आदेश दिला होता, शीला दीक्षित यांच्या कॉमनवेल्थ भ्रष्टाचाराच्या चौकशीचाही आदेश दिला होता. त्याचबरोबर थेट मुकेश अंबानी यांना आरोपी म्हणून पोलीस ठाण्यात नोंदवणारा गॅस दरवाढीच्या चौकशीचा आदेशही त्यांनी दिला होता. भ्रष्टाचाराचे निर्मुलन करण्याचा रामबाण उपाय म्हणून ज्या जनलोकपाल विधेयकाकडे ते पहात आहेत किंवा लोकांनी पहावे असा आग्रह धरत आहेत ते विधेयक अस्त्विात नसतानासुध्दा शीला दीक्षित, मुकेश अंबानी, वीरप्पा मोईली यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू होतीच. मग त्यांनी हातात असलेल्या कायद्यांचा वापर करून भ्रष्टाचाराच्या चौकशीचा तर्कशुध्द शेवट करून आपली भ्रष्टाचार मुक्तीची क्षमता दाखवून द्यायला हवी होती. पण आता मोईली, शीला दीक्षित, मुकेश अंबानी यांच्यावरचे आरोप अर्धवट सोडून त्यांनी जनलोकपालाचा बहाणा करून मैदानातून पळ काढला आहे. पण त्यातून लोकसभा निवडणुकीसाठी आपली प्रतिमा तयार होईल असा त्यांचा भ्रम आहे.

Leave a Comment