अशोक चव्हाण पुन्हा निवडणूकीच्या रिंगणात

औरंगाबाद – आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आतापासूनच सुरूवात झाली आहे. आदर्श प्रकरणामुळे पायउतार व्हावे लागलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण पुन्हा राजकारणात सक्रीय झाले असून त्यांच्यावर मराठवाडयातील काही मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा ते निवडणूकीच्या रिंगणात उतरले असून त्यांनी प्रचाराची सुरुवात औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून केली आहे.

औरंगाबाद येथील मेळाव्यात बोलताना माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, आगामी निवडणुकीचा प्रचार करताना विरोधकांनी मोठा भूलभुलय्या निर्माण केला आहे. राज्यातील व केंद्रातील सत्ता टिकवायची असेल तर वैचारिक तलवारी बाहेर काढून कामाला लागा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सेवा दलाच्या कार्यकर्त्यांना केले. सेवा दलाच्या मराठवाडा विभागीय कार्यकर्ता मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दायमा होते, शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, आमदार डॉ. कल्याण काळे, अब्दुल सत्तार, माजी खासदार उत्तमसिंह पवार उपस्थित होते.

आगामी काळात सत्ता येईल, असे काम काँग्रेस सरकारने करून ठेवले आहे. फक्त विरोधकाच्या भूलभुलय्यातून बाहेर पडण्याची गरज आहे. खोटं बोल पण रेटून बोल असे अभियान विरोधकांनी चालवले असून खरा प्रचार करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने घरोघर जाण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी चव्हाण यांनी सांगितले.