समुद्राखालचा विक्रमी लांबीचा बोगदा चीनमध्ये

शांघाय – जगातील सर्वाधिक लांबीचा समुद्राखालचा अंडरवॉटर बोगदा चीनमध्ये बनविला जाणार आहे. या बोगद्याच्या मंजुरीसाठीचा प्रस्ताव सरकारकडे दाखल केला गेला आहे आणि मंजुरींनंतर २०१५-१६ सालात त्याचे प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे. हा बोगदा पूर्ण होण्यास १० वर्षांचा कालावधी लागणार आहे. १२३ किमी लांबीचा हा बोगदा पूर्व चीनमधील डालियान ते शेंडोंग या दोन शहरांना जोडणार आहे. हा बोगदा पूर्ण झाल्यानंतर सध्या या अंतरासाठी लागणारा ८ तासांचा प्रवासाचा कालावधी अवघ्या ४० मिनिटांवर येणार आहे असे समजते.

सध्या या प्रकारचा जगातील सर्वाधिक लांबीचा बोगदा जपानमध्ये असून तो ५४ किमी लांबीचा आहे. चीनमध्ये बनविल्या जाणार असलेल्या बोगद्याचा प्रस्ताव १९९४ सालीच ठेवला गेला होता व तेव्हा त्यासाठी १ हजार कोटी डॉलर्स खर्च येणार होता. आता हा बोगदा बांधण्यासाठी ३६३० कोटी डॉलर्स इतका खर्च अपेक्षित आहे.