हे तर खरे अर्थकारणच

आपल्या देशातल्या राजकारणामध्ये विविध प्रकारच्या विचारसरणीचा संघर्ष चाललेला असतो असे आपण मानतो. परंतु प्रत्यक्षात हा विचारसरणींचा संघर्ष नसून विविध प्रकारच्या आर्थिक हितसंबंधांचा संघर्ष आहे. हे राजकारण आपण त्याला राजकारण म्हणत असलो तरी प्रत्यक्षात ते अर्थकारण आहे. वरवर पाहिल्यास आपल्याला ते राजकारण वाटते परंतु सूक्ष्मपणे अवलोकन केले तर या राजकारणामागे एक अर्थकारण गुंतले असल्याचे आपल्या लक्षात येते. निरनिराळे राजकीय पक्ष, विविध संघटना, जातीय किंवा प्रांतीय गट जेव्हा राजकारणामध्ये निरनिराळ्या हालचाली करतात तेव्हा त्या प्रत्येकाच्या मागे आर्थिक हितसंबंध गुंतलेले असतात. किंबहुना आजच्या काळातले राजकारण अर्थकारणाने एवढे लिप्त झालेले आहेत की प्रत्येक घटनेशी संबंधित असलेल्या राजकारणामागे आर्थिक हितसंबंध आपले खेळ करत आहेत असे लक्षात येते. तेलंगणाचा प्रश्‍न असाच आहे. तेलंगणाला विरोध करणार्‍या खासदारांनी वरवर पाहता राजकारणासाठी विरोध करत असल्याचे दाखवले असले तरी प्रत्यक्षात या खासदारांचे आर्थिक हितसंबंध तेलंगणात गुंतलेले आहेत किंवा आंध्र प्रदेश अखंड राहण्यानेच त्यांचे आर्थिक हित साधले जाणार आहे.

तेलंगण निर्मिती हा राजकीय प्रश्‍न नसून आर्थिक प्रश्‍न बनला आहे. जेव्हा एखाद्या निर्णयात एखाद्या घटकाचे आर्थिक हितसंबंध गुंततात तेव्हा ते हितसंबंधी गट अगदी पराकोटीला जाऊन त्या निर्णयाला विरोध करत असतात. तसा विरोध काल या भागातल्या खासदारांनी संसदेत केला. आजवर तेलंगणच्या प्रश्‍नाचा उल्लेख तेलंगणचा तिढा अशा शब्दात केला जात होता. परंतु आता आज या संबंधात जी परिस्थिती निर्माण झाली आहे तिचा विचार केला तर तेलंगणचा तिढा आता तेलंगणच्या वणव्यात रुपांतरित होण्याची शक्यता आहे. या खासदारांनी आपल्याला करता येईल तेवढ्या लज्जास्पद अतिरेकी प्रकाराने संसदेच्या सभागृहात तेलंगणाला असलेला आपला विरोध प्रकट केला. कॉंग्रेसच्या एका खासदाराने खिशात तिखटाची पूड ठेवून सभागृहात प्रवेश तर केलाच पण तेलंगणाचे विधेयक मांडले जाताच आपल्या जवळची पूड उधळली. त्याचवेळी तेलुगु देसम पक्षाच्या खासदाराच्या हातात चाकू असल्याचे लक्षात आले. तिखटाची पूड आणण्याचे कारण काय असा प्रश्‍न विचारला असता त्या खासदाराने दिलेले उत्तर मोठे चक्रावून टाकणारे आहे. आपण स्वतःच्या संरक्षणासाठी तिखटाची पूड जवळ ठेवत असतो, असे त्यांनी सांगितले.

संरक्षणासाठी तिखट जवळ ठेवणार्‍या या खासदाराने प्रत्यक्षात मात्र तिखटाचा वापर संरक्षणासाठी न करता आक्रमणासाठी केला. एवढ्या टोकाला जाऊन संसदेत गोंधळ घालावा अशी भूमिका या खासदारांनी का घेतली याचा नीट बोध होत नाही. राज्याचे विभाजन होणे ही गोष्ट कोणाला आवडणार नाही हे ठिक आहे. अशा वेळी त्यांनी आपला विरोध संसदीय मार्गाने व्यक्त केला तर तो आपण समजून घेऊ शकतो. पण राज्याचे विभाजन होणे हे आपल्या प्राणावरचे संकट आहे असे या खासदारांना का वाटते, त्यांची विचार करण्याची पध्दत काय याचा काहीच बोध होत नाही. तेलंगणाची निर्मिती होत आहे म्हणजे आपल्या राज्याचा प्रशासनीक बदल होत आहे. तेलंगण राज्य निर्माण होणे म्हणजे तेलंगणाचा हिस्सा दुसर्‍या कोण्या देशाला देणे असा तर प्रकार नक्कीच नाही. भारतात काही वेळा काश्मीरच्या भवितव्यावर चर्चा चालते. काश्मीर पाकिस्तानात जाणार का असा प्रश्‍न काही लोक उपस्थित करतात. तो खरोखर पाकिस्तानात जायला लागला तर आणि कोणी त्यासाठी प्राण द्यायला तयार झाला तर ती गोष्ट आपण समजून घेऊ शकतो. कारण त्या परिस्थितीत देशाच्या अखंडत्वाचा मुद्दा उपस्थित झालेला असतो. पण तेलंगण निर्मितीत असा काही मुद्दा नाही. अगदी भावनिक विचार केला तरी तेलंगण निर्मिती झाल्यामुळे कोणीतरी प्राण द्यायला तयार व्हावे हे काही आवश्यक नाही.

मात्र सीमांध्रा भागातले खासदार तेलंगण निर्मितीला प्राणपणाने विरोध करत आहेत आणि त्यांनी जनतेची दिशाभूल करून जनतेला सुध्दा हे फार मोठे संकट आहे असे भासवले असल्यामुळे जनतासुध्दा या राज्य निर्मितीला तिव्रतेने विरोध करायला लागली आहे. या सगळ्या गोष्टींच्या अनुरोधाने नेत्यांचे आणि जनतेचेही मनोविश्‍लेषण होण्याची गरज आहे. जनतेच्या मनामध्ये सध्या प्रादेशिक भावना फार वाढवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, द्रमुक, शिवसेना, तेलुगु देसम, अकाली दल असे पक्ष राज्याचे हित सर्वोपरी अशी भूमिका घेऊन काम करत असतात आणि आपल्या या कामाच्या स्वार्थासाठी त्यांनी लोकांच्या मनात प्रादेशिक भावना वाढवलेल्या असतात. त्यांचा वापर करून नेते आपले स्वार्थ साधत असतात. आंध्रातल्या जनतेची दिशाभूल झाल्यामुळे ही जनता तेलंगणाला विरोध करत आहे. परंतु नेत्यांचे त्या मागचे स्वार्थ वेगळे आहे. सीमांध्रा भागातल्या अनेक नेत्यांनी, मंत्र्यांनी आणि खासदारांनी तेलंगणामध्ये आणि विशेषतः हैदराबाद शहरामध्ये आपले काळे आणि गोरे पैसे गुंतवलेले आहेत. आपली गुंतवणूक झालेले हे शहर आणि हा भाग तेलंगणाच्या रुपाने दुसर्‍या राज्यात गेला तर आपल्या आर्थिक हितसंबंधात बाधा येईल म्हणून हे लोक तेलंगणाला विरोध करत आहेत. ते लोकांना भासवतात तसे तेलंगण हे तेलुगु भाषेवर, आंध्र प्रदेशावर, देशाच्या एकात्मतेवर किंवा तेलुगु अस्मितेवर आलेले संकट नाही. असलेच तर ते त्यांच्या पैशावर आलेले संकट आहे आणि म्हणून त्यांना तेलंगण नको आहे. मात्र आपल्या पैशाच्या स्वार्थासाठी ते लोकांच्या भावना भडकवत आहेत.

Leave a Comment