नेहरू प्लेससह अनेक मार्केटस अमेरिकेकडून काळ्या यादीत

नवी दिल्ली – अमेरिकेने दिल्लीतील नेहरू प्लेस आणि गफ्फार मार्केटसह कांही प्रमुख शहरातील मार्केटस कुख्यात म्हणून काळ्या यादीत टाकली आहेत. त्यात मुंबईतील मनीष मार्केट लॅमिग्टन रोड, हैदा्राबाद मधील चिनॉय ट्रेड सेंटर व हाँगकाँग बाजार यांचाही समावेश आहे. जागतिक पायरसी आणि बौद्धिक संपदा अधिकारांचे या मार्केटमधून सर्रास उल्लंघन होत असल्याचे अमेरिकेतील व्यापार प्रतिनिधींनी सादर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

नेहरू प्लेस सर्व बाजारात कुख्यात म्हणून आघाडीवर आहे. येते पायरेटेड सॉफ्टवेअर, संगीत सीडी, नकली सामानाची विक्री मोठ्या प्रमाणावर होते असे व्यापार प्रतिनिधी माईक फ्रॉमन यांचे म्हणणे आहे. यामुळे अमेरिकन कामगारांच्या कामाच्या मूल्यांचे नुकसान होतेच पण त्यांच्या नोकर्‍याही संकटात येतात असे त्यांचे म्हणणे आहे. गफ्फार मार्केट नकली ब्रँडेड कपडे, पादत्राणे, सौंदर्य प्रसाधने, इलेक्ट्रीकल सामान यासाठी प्रसिद्ध आहे. येथील सर्व माल आयात केला जातो.

मुंबईचे मनीष मार्केट व लॅमिग्टन रोड वर बनावट सीडी, डिव्हीडी व पायरेटेड सीडींचा मोठा व्यापार होतो तर हैद्राबादच्या चिनॉय ट्रेड सेंटर व हाँगकाँग बाजारात पायरेटेड सॉफ्टवेअर व हार्डवेअर मोठ्या प्रमाणात विकले जाते. पोलिसांच्या छाप्यांचा या मार्केटवर कोणताच परिणाम होत नाही असेही फ्रॉमन यांचे म्हणणे आहे.