आयपीएल स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत होण्याची शक्यता

मुंबई- आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकाच्या पार्श्ववभूमीवर आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव आयपीएल स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच अन्य दोन देशांचा विचार सुरू आहे. पाच वर्षापूवी लोकसभा निवडणुकीवेळी आयपीएल स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत झाल्या होत्या. त्यामुळे यंदाच्या आयपीएल स्पर्धा सुरक्षीततेच्या कारणस्त्व भारताबाहेर खेळविल्या जाणार असल्याची शक्यता आयपीएलचे अध्यक्ष रणजिब बिस्वाल यांनी वर्तवली आहे.

लोकसभा निवडणुका ठरल्याप्रमाणे म्हणजेच एप्रिल- मे महिन्यात होणार आहेत. या निवडणुकांकरिता मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त करावा लागतो. याचवेळी आयपीएल स्पर्धेत अनेक परदेशी खेळाडू सहभागी होत असतात, त्यामुळे तेथेही पोलिस बंदोबस्त ठेवावा लागतो. एकाचवेळी निवडणुका व आयपीएल स्पर्धा असल्या, तर पोलिसांवर मोठ्या प्रमाणावर ताण पडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आयपीएल स्पर्धा कार्यक्रमात बदल होण्याची शक्यता आहे.
आगामी काळात गृह विभागातील अधिका-यांशी आयपीएलच्या् संयोजकाची एक बैठक घेऊन येत्या १० दिवसांत स्पर्धा नक्की कोठे घ्यायच्या याचा निर्णय घेऊन वेळापत्रक जाहीर करणार येणार आहे. इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) २०१४ मध्ये होणा-या सातव्या मोसमातील स्पर्धा भारतात व्हावा, असे आम्ही ठरवले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

भारतात सामने शक्य, नसल्यास दक्षिण आफ्रिकेत स्पर्धा घेण्याचा विचार केला जात आहे. बीसीसीआयने आयोजनासाठी अन्य पर्यायांचाही विचार केला आहे. आपल्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, मात्र केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतरच आपण वेळापत्रक ठरवू, असे बिस्वाल यांनी सांगितले. साधारण नऊ एप्रिल ते तीन जून दरम्यान आयपीएल स्पर्धा होतील, असे ते म्हणाले. तसेच गृहखात्याने हिरवा कंदिल दिल्यास सर्व आयपीएल सामने भारतातच होतील, असेही त्यांनी सांगितले. यापूर्वी २००९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान आयपीएल सामने दक्षिण आफ्रिकेत झाले होते. मात्र बीसीसीआय आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्ड यांचे संबंध सध्या चांगले नाहीत. त्यामुळे भारतीय वेळेत अर्ध्या तासाचा फरक असणा-या श्रीलंका किंवा बांगलादेश या दोन पर्यायांचा प्राधान्याने विचार होऊ शकतो.

Leave a Comment